मुंबई - आंब्याचा हंगाम सुरू झाला असून, देश लॉकडाऊन आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करूनही ग्राहकांपर्यंत फळांचा राजा पोहोचण्याचा मार्ग आता काही आंबे विक्रेते आणि कृषी पणन मंडळाने उपलब्ध केला आहे. आंब्याची ही खरेदी विक्री उत्पादक आणि ग्राहक ऑनलाईनमार्गे करता येणार आहे.
कोकणातील उत्पादकांद्वारे हापूस आंबा शहरातील ग्राहकांना उपलब्ध व्हावा यासाठी आंबे विक्रेते आणि महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ दरवर्षी आंबा महोत्सव आयोजित करते. मात्र, यंदा हवामान तसेच कोरोनामुळे महोत्सवाचे आयोजन अशक्य होते. कोरोनामुळे उत्पादकांना विक्रीसाठी शहरात यावे लागू नये, तसेच शहरातील ग्राहकांनाही घराबाहेर किंवा सोसायटीबाहेर पडावे लागू नये, याकरीता ऑनलाईन आंब्यांची योजना विक्रेत्यांनी आणि पणन विभागाने आखली आहे.
पणन विभागाने नुकतेच परवा ऑनलाईन आंबे विक्रीची योजना जाहीर केली. मात्र, आंबे आल्यापासूनच कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. त्यामुळे काही उत्पादकांनी अगोदरच आपल्या समाज माध्यमावर ऑनलाईन आंबे विक्रीला सुरुवात केल्याचे पाहायला मिळत होते. ऑनलाईन परस्पर आंबे विक्री करताना त्यांना काही अडचणी येत होत्या. मात्र, आता राज्य शासनानीच ऑनलाईन विक्रीचे नियोजन केल्याने उत्पादकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
ऑनलाईन आंबा खरेदी कशी कराल?
उत्पादक ते ग्राहक या दोघांनीही ऑनलाईन पोर्टलद्वारे आंबा खरेदी-विक्रीची माहिती उपलब्ध व्हावी, यासाठी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या www.msamb.com या संकेतस्थळावरील Buyer Seller Information लिंकद्वारे अथवा bs.msamb.com या लिंकद्वारे खरेदीदारांना नोंदणीची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.तसेच उत्पादक व विक्रेते आपल्या स्वतःचा पद्धतीने आंबे ऑनलाईन विक्री समाज माध्यमावर करत आहेत. आंबे चाहत्यांसाठी ही खूषखबर आहे. आंबे हे सध्या ऑनलाईन मार्फत 3 हजार 500 ते 9 हजार रुपये पेटीचा भाव आंबे प्रजातीनुसार आहे. किमान 700 पेट्या जर एका शहरात पाठवायचा असतील तर त्या आम्हाला सोयीस्कर पडत आहेत. पण शहरात सर्वत्र लॉकडाउन असल्यामुळे सर्व लोकांपर्यंत पोहचणे आताही अडचणीच जात आहे. कारण ऑर्डर ह्या एकाच ठिकाणी नसून वेगवेगळ्या ठिकाणी आहेत त्यामुळे आम्हाला वाहतुकीसाठी खूप खर्च जातो पण फळ नाशवंत असल्यामुळे तोट्यात जाऊन आम्हाला विक्री करावी लागत आहे असे विक्रेते सांगत आहेत.
यामुळे १० एप्रिल ते १० जून हा आंब्याचा मुख्य हंगाम असतो. त्याआधी १५ फेब्रुवारी ते १० एप्रिल हा आंब्याचा पहिला हंगाम असतो. या काळात आंब्याची वेगवेगळ्या ठिकाणांहून आवक सुरू होते.परंतु यंदा कोरोनाचे सावट सर्वत्र आहे. त्यामुळे उशिरा का होईना हळूहळू ऑनलाइनमार्फत आंब्याच्या खरेदी विक्रीचा व्यवसाय सुरू झाला आहे. यंदा दरवर्षी प्रमाणे होणाऱ्या उत्पादनापेक्षा 25 टक्केच उत्पादन हवामान आणि काही अडचणीमुळे झाले आहे. त्यामुळे ज्या प्रमाणात आता आंबे उपलब्ध आहेत ते कोविडपासून लोकांचे डिस्टनसिंग ठेऊन. आम्ही स्वतः विक्रेते आमच्या संपर्कामार्फत आणि पणन विभागामार्फत आता ऑनलाईन आंबे लोकांपर्यंत घरी पोहचवत आहोत, अशी माहिती आंबे उत्पादक व विक्रेत्या नम्रता देसाई यांनी दिली आहे.
आंबे खरेदीसाठी आणि विक्रीसाठी संपर्क
www.msamb.com (शेतमाल खरेदी विक्री कंपनी, देसाई नम्रता, 918766811485)