मुंबई - कोणत्याही संकटाच्या काळात महाराष्ट्राने देशाला दिशा देण्याचे काम केले आहे. ज्या-ज्या वेळी हिमालयावर संकट आले त्या-त्या वेळी सह्याद्री मदतील धावतो असे म्हटले जाते. आज संपूर्ण देशावर कोरोनाचे संकट आले आहे. या काळात महाराष्ट्रातील काही जिगरबाज अधिकारी बाहेरच्या राज्यात आपलं कर्तृत्व सिद्ध करत आहेत. कोरोना विरोधातील लढाई जिकंण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करुन देशात आपल्या महाराष्ट्राचा नावलौकिक करत आहेत. आज महाराष्ट्र दिनी अशाच कर्तृत्त्ववान अधिकाऱ्यांच्या कामगिरीची ईटीव्ही भारतने घेतलेला आढावा...
विजय कुलांगे (ओडिशातील गंजामचे जिल्हाधिकारी)
मूळचे अहमदनगरचे असलेले विजय कुलांगे कोरोनाच्या लढाईत उत्तम प्रशासकीय कारभार पाहात आहेत. कोरोनाचा सामना करण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना राबवताना दिसत आहेत. त्यांच्या योग्य नियोजनामुळे, खबरदारीमुळे आणि नियमांची योग्य पद्धतीने अंमलबजावणी केल्यामुळे गंजाम भागात अद्याप एकही कोरोनाचा रुग्ण आढळलेला नाही. याचं सर्व श्रेय जातं ते जिल्हाधिकारी कुलांगे यांना. मुंबई, सुरत, केरळ येथून तब्बल २२००० लोक गंजामला आले आहेत. या सर्वांना होम क्वारंटाईन’ केले असले, तरी एकही बाधित रुग्ण अद्याप त्या ठिकाणी आढळून आला नाही. तसेच ओडिशातील विस्थापित लोकांना जिल्ह्यात आणण्यासाठीही त्यांची भूमिका महत्त्वाची होती.
काय केले
- 1) एकही रुग्ण सापडणार नाही याची दक्षता घेतली
- 2) लोकांचा विश्वासन संपादन करून घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले
- 3) जिल्ह्यात देऊळबंदी करण्यात आली
- 4) सायकलवर जाऊन स्थानिक नागरिकांच्या अडचणी जाणून घेतल्या
- 5) नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी केली.
महेश भागवत (राचाकोंडाचे पोलीस आयुक्त, तेलंगाणा)
प्रत्येक मराठी माणसाला अभिमान वाटावा, असे कार्य महेश भागवत यांचे आहे. अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी हे त्यांचे मूळ गाव आहे. ते सध्या तेलंगाणा राज्यातील राचाकोंडाचे पोलीस आयुक्त म्हणून काम करत आहेत. तेलंगाणा राज्यातील 'अन्नदाता' अशी त्यांची ओळख आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात सध्या लॉकडाऊन आहे. या काळात हातावर पोट असणाऱ्या गोरगरिबांच्या पोटाचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा निराधार असणाऱ्या 20 हजार लोकांच्या पोटाची भूक भागवण्याचे काम सध्या ते करत आहेत. तसेच तेलंगाणातील 41 वृद्धाश्रम त्यांनी दत्तक घेतले आहेत. तेथील 1 हजार 600 वृद्धांच्या जेवणाची सोयही ते करत आहेत. या त्यांच्या कामामुळे अन्नदाता अशी त्यांची ओळख झाली आहे.
तेलंगाणातील अनेक विलगीकरण कक्षाला ते भेटी देत असून तेथील अडचणी सोडवण्याचे काम ते करत आहेत. तसेच या काळात कायदा मोडणाऱ्यांना वठणीवर आणण्याचे कामही त्यांनी केले आहे. मानवी तस्करीला प्रतिबंध आणि बालकामगार विरोधी त्यांनी विशेष कार्य केले आहे. या त्यांच्या कार्यबद्दल त्यांना अनेक आंतराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. यापैकीच अमेरिकेचा प्रतिष्ठेचा समजला जाणारा 'TIT HERO AWARD' हा 2017 साली त्यांना मिळाला. तसेच देशातील 50 प्रभावशाली अधिकाऱ्यांच्या यादीत त्यांचा समावेश करण्यात आला होता. 1 हजाराहून अधिक महिला आणि मुलांना त्यांनी मानवी तस्करीच्या विळख्यातून बाहेर काढले आहे. तसेच त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले आहेत. कम्युनिटी पोलिसिंग मॉडलसाठीही ते प्रसिद्ध आहेत.
सागर डोईफोडे (जम्मू कश्मीरमधील डोडाचे जिल्हााधिकारी)
संपूर्ण देशात दिवसेंदिवस कोरोनाचा विळखा वाढत असताना जम्मू कश्मीरमधील डोडा जिल्हा हा कोरोनामुक्त आहे. याचे सगळे श्रेय जाते ते डोडाचे मराठी अधिकारी सागर डोईफोडे यांना. सागर डोईफोडे हे बारामती तालुक्यातील लिंबोर्डी गावचे रहिवासी आहेत. कोरोनाची चाहूल लागताच लॉकडाऊन जाहीर होण्यापूर्वी 10 दिवस आधीच त्यांनी जिल्ह्यांच्या बॉर्डर सील केल्या. तसेच जिल्ह्यात त्यांनी क्वारंटाईन केलेल्या नागरिकांना घरपोच किराणा तसेच अत्यावश्यक सेवा पोहोचवण्यासाठी स्वतंत्र हेल्पलाईन सुरू केली.
डोईफोडे यांनी बाहेरच्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या 2 वेळच्या जेवनाची सोय केली आहे. तसेच 'डिस्ट्रीक्ट किचन' ही संकल्पना राबवून 5 ते 6 जणांच्या जेवणाची सोय केली आहे. या कामात त्यांनी जिल्ह्यातील प्रत्येक सरपंचांपासून ते लोकप्रतिनिधींना बरोबर घेतले आहे. जिल्ह्यात मास्कचा तुटवडाअसताना त्यांनी जिल्ह्यातच मास्क तयार केले. त्यांच्या या कार्याबद्दल पंतप्रधान कार्यालयानेही त्यांचे कौतुक केले. सागर डोईफोडेंचा 'डोडा पॅटर्न' हा पथदर्शी ठरत आहे.
रमेश घोलप (झारखंडमधील कोडरमाचे जिल्हाधिकारी)
रमेश घोलप हे सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील महागावचे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून शिक्षण घेऊन यश कमावले आहे. ते सध्या झारखंडमधील कोडरमा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून काम करत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोडरमा जिल्ह्याचा कारभार उत्तम रितीने ते सांभाळत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन असल्याने अनेक ठिकाणी गोरगरिबांच्या पोटाचा प्रश्न निर्माण झाला आहे. या काळात त्यांनी जिल्हा प्रशासनातर्फे 'फूड बँक' सुरू केली आहे. या माध्यमातून ते गरजूंना अन्न पुरवठा करत आहेत. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाढते सॅनिटायझरचे दर लक्षात घेऊन त्यांनी स्वस्त दरात सॅनिटायझर उपलब्ध करून दिले आहेत. तसेच त्यांनी त्यांचा पगारही कोरोना विरुद्धच्या लढ्यासाठी दिला आहे.