मुंबई - सलग दुसऱ्यांदा भाजपने केंद्रात घवघवीत यश मिळवले. नरेंद्र मोदी हे उद्या (गुरुवार) दुसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात कोणाकोणाला स्थान मिळणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. महाराष्ट्रातील अनेक नेत्यांची मंत्रीपदासाठी नावे चर्चेत आहेत. मात्र, मंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
भाजपकडून 'या' नेत्यांची नावे चर्चेत
भाजपकडून महाराष्ट्रातील नितीन गडकरी, पियुष गोयल, प्रकाश जावडेकर, डॉ. सुभाष भामरे, गोपाळ शेट्टी, पूनम महाजन यांच्या नावांची जोरदार चर्चा आहे. मात्र, यामध्ये आता कोणाला संधी मिळणार हे उद्या स्पष्ट होणार आहे.
शिवसेनेकडून 'या' नेत्यांच्या नावांची चर्चा
शिवसेनेकडून मंत्रीपदासाठी अनेक नेत्यांच्या नावांची चर्चा आहे. सेनेला ४ मंत्रीपदे मिळण्याची शक्यता आहे. यामध्ये संजय राऊत, पाचव्यांदा खासदार झालेल्या भावना गवळी, गजानन कीर्तिकर अनिल देसाई, राहुल शेवाळे यांच्या नावांची चर्चा आहे. २०१४ च्या मंत्रिमंडळात शिवसेनेला एकमेव मंत्रीपद मिळाले होते. अनंत गीते यांना संधी देण्यात आली होती. मात्र, यावेळी त्यांचा रायगड लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या सुनिल तटकरे यांनी पराभव केला आहे.
रायगडमधून अनंत गीते, औरंगाबादमधून चंद्रकांत खैरे, अमरावतीमधून आनंदराव अडसूळ यांचा यावेळी पराभव झाला. यावेळी खैरे आणि अडसूळ जिंकले असते तर त्यांची मंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता होती.
रामदास आठवलेंच्या नावाचीही चर्चा
२०१४ मध्ये रामदास आठवलेंना केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्रीपद दिले होते. यावेळीही त्यांना मंत्रीपद दिले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.