मुंबई - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांत राज्यात 34 पोलिसांचा मृत्यू झाला आहे. या पोलिसांमध्ये मुंबईतील 20 पोलीस व 1 अधिकारी असे एकूण 21, पुणे 2, सोलापूर शहर 2, नाशिक ग्रामीण 3, एटीएस 1, मुंबई रेल्वे 1, ठाणे ग्रामीण 2, जळगाव ग्रामीण 1 यांचा समावेश आहे. सध्या 1 हजार 437 पोलिसांवर राज्यातील वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू असून यात 196 पोलीस अधिकारी व 1 हजार 241 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
लॉकडाऊन काळात राज्यभरात कलम 188 नुसार तब्बल 1 लाख 23 हजार 637 गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. मुंबई वगळता राज्यात इतरत्र क्वारंटाइनचा नियम मोडणाऱ्या 718 जणांवर कारवाई करण्यात आली. राज्यभरात या काळात पोलिसांवर हल्ला होण्याच्या 262 घटना घडल्या असून या प्रकरणी आतापर्यंत 845 जणांना अटक करण्यात आली.
कोविड-19च्या संदर्भात तब्बल 1 लाख 687 कॉल पोलीस नियंत्रण कक्षावर आले आहेत. अवैध वाहतुकीच्या 1 हजार 332 प्रकरणात 23 हजार 893 जणांना अटक करण्यात आली आहे. आतापर्यन्त 80532 वाहने जप्त करण्यात आली असून तब्बल 6 कोटी 70 लाख 89 हजारांचा दंड पोलिसांनी थोटावला आहे. राज्यात वैद्यकीय पथकावर हल्ला होण्याच्या 46 घटना घडल्या असून 86 पोलीस जखमी झाले आहेत.
लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत अत्यावश्यक सेवेसाठी 4 लाख 60 हजार 318 पास पोलीस विभागामार्फत देण्यात आले. तर संपूर्ण राज्यात 5 लाख 86 हजार व्यक्तींना क्वारंटाइन करण्यात आले आहे. राज्यभरात हातावर क्वारंटाइन असा शिक्का असतानाही फिरणाऱ्या 718 व्यक्तींना शोधून पोलिसांनी त्यांना विलगीकरण कक्षात पाठविले. परदेशी नागरिकांकडून झालेले व्हिसा उल्लंघनचे 15 गुन्हे राज्यभरात नोंदवले आहेत.