मुंबई - विक्रोळी येथील सूर्यनगर भागात बकऱ्याने दिलेल्या धडकेत एका १३ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. शिरताज अली असे या मुलाचे नाव आहे. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
हा मुलगा घराबाहेर खेळत असताना त्याला रस्त्यावर मोकाट सोडलेल्या एका बकऱ्याने धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की तो जमिनीवर कोसळला. या धडकेत त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याच्या वडिलांनी त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्याची परिस्थिती गंभीर असल्याने त्याला सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
शिरताज हा उत्तरप्रदेशातून उन्हाळ्याच्या सुट्टीत मुंबईत आपल्या आई-वडिलांकडे आला होता. मात्र, घराबाहेर खेळत असताना रस्त्यावर मोकाट सोडलेल्या बकऱ्याच्या हल्ल्यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे त्याच्या परिवाराला जबर धक्का बसला आहे. रस्त्यावर सोडलेल्या पाळीव प्राण्यांमुळे अशाप्रकारे एखाद्याचा मृत्यू होत असेल तर या पाळीव प्राण्याच्या मालकावर गुन्हा दाखल करणे गरजेचे होते. मात्र, पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली. त्यामुळे संबंधित मालकावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शिरताजच्या कुटुंबीयांनी केली आहे.