मुंबई - देशभरात जानेवारीपासून कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली आहे. मुंबई महापालिकेने लसीकरणाचा 2 लाखांचा टप्पा ओलांडला आहे. तिसऱ्या टप्प्यात जेष्ठ नागरिक आणि विविध आजाराने त्रस्त असलेल्या नागरिकांना लस देण्यासाठी पालिका सज्ज झाली आहे. तिसऱ्या टप्प्यात खासगी रुग्णालयातही पैसे आकारून लसीकरण केले जाणार आहे. मात्र त्यासाठी रुग्णालयाच्या लसीकरणाची क्षमता आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण, आदी सर्व बाबीची पूर्तता होण्यास आठ ते दहा दिवस लागणार आहेत. त्यामुळे
खासगी रुग्णालयातील लसीकरणासाठी आणखी आठ ते दहा दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
कोरोना लसीकरण
मागील वर्षी मार्च महिन्यापासून कोरोनाचा प्रसार सुरू झाला. गेल्या अकरा महिन्यात करण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे कोरोना आटोक्यात आला. मात्र फेब्रुवारी महिन्यापासून पुन्हा कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ पाहायला मिळत आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना राज्यात १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली. राज्यात आतापर्यंत 12 लाख तर मुंबईत 2 लाख 15 हजार लाभार्थ्यांना लस देण्यात आली. मुंबईत आणि राज्यात सध्या महापालिका आणि सरकारी रुग्णालयात लसीकरण केले जात आहे. मुंबईत काही ठिकाणी खासगी रुग्णालयांमधील कर्मचाऱ्यांना लसीकरण करता यावे, म्हणून खासगी रुग्णालयांना लसीकरणाची परवानगी देण्यात आली आहे.
आठ ते दहा दिवसाचा कालावधी लागणार
कालच केंद्र सरकार, राज्य आणि मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाची व्हिडिओ कॉन्फरन्सिगद्वारे बैठक झाली. या बैठकीत तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणाबाबात चर्चा करण्यात आली. खासगी रुग्णालयांना लसीकरण करण्यास परवानगी देण्याबाबतची चाचपणी करण्याचे आदेश आरोग्य विभागाला देण्यात आले आहेत. खासगी रुग्णालयाची लसीकरणाची क्षमता, रुग्णालयात किती लसीच्या साठवणुकीची क्षमता आहे याचा आढावा घेण्यास सांगण्यात आले आहे. खासगी रुग्णालयांचा आढावा घेण्यास आणखी आठ ते दहा दिवसाचा कालावधी लागणार आहे. लसीकरण करण्यासाठी खासगी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच खासगी रुग्णालयात नागरिकांना पैसे देऊन लस घ्यावी लागणार आहे. हे पैसे किती घेतले जावेत, हे अद्याप केंद्र सरकारने स्पष्ट केलेले नाही. यामुळे खासगी रुग्णालयात लसीकरण करण्यासाठी आणखी आठ ते दहा दिवसांचा कालावधी लागणार असल्याची माहिती आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.
3 लाख लसींचा साठा
मुंबईत सध्या 30 लसीकरण केंद्र आहेत. तिसऱ्या टप्प्यात जेष्ठ नागरिकांना लस द्यायची आहे. मुंबईत त्यांची संख्या 25 लाख आहे. त्यासाठी 100 लसीकरण केंद्र तयार करण्यात येतील. पालिकेकडे 5 लाख 25 हजार लसीचे डोस उपलब्ध झाले होते. त्यापैकी 2 लाख 25 हजार लस टोचण्यात आल्या. सध्या 3 लाख लसी उपलब्ध आहेत. लसीकरणासाठी आणखी लसीचा साठा लागणार आहे. तो साठवण्यासाठी कांजूर येथील जागा सज्ज झाली आहे. 10 लाखांहून अधिक साठा आल्यास कांजूर येथे लस ठेवली जाईल, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.