मुंबई - बोरिवली रेल्वे स्थानकावर एका महिला प्रवाशाची सोन्याच्या व चांदीच्या दागिन्यांची विसरलेली बॅग चोरणाऱ्या आरोपीला बोरिवली जीआरपी पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून 4 लाख 74 हजार रुपयांचा मुद्देमाल पुन्हा हस्तगत केला आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या प्रकरणातील पीडित तक्रादाराचे वय 51 वर्षे असून चोरी करणारा आरोपीचेही 51 वर्षे आहे. तर पोलिसांना चोरी करणाऱ्या आरोपीला मुद्देमालासह अटक करण्यासाठी 51 दिवसाचा वेळ लागला आहे.
या प्रकरणातील पीडित महिला जयरुबी चलेयतुरे (वय 51 वर्षे) या 12 जानेवारी रोजी नालासोपारा येथून आपल्या पतीसोबत गोरेगावला जाण्यासाठी लोकलने प्रवास करत होत्या. मात्र, या प्रवासादरम्यान लोकल गोरेगाव स्थानकावर थांबणार नसल्याचे लक्षात आल्यावर त्या बोरिवली स्थानकावर फलाट क्रमांक 5 वर उतरल्या होत्या. काही वेळातच लोकल आल्यानंतर त्यांनी घाई गडबडीत त्यांच्या जवळील दागिन्यांची पिशवी जागेवर सोडून लोकलमध्ये प्रवेश केला. यावेळी बोरिवली रेल्वे स्थानकावर फिरत असलेल्या मोहम्मद सिद्दीकी (वय 51 वर्षे) या आरोपीची नजर या दागिन्यांच्या पिशवीवर गेल्यानंतर आरोपीने काही वेळातच दागिन्यांची पिशवी घेऊन जाताना रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्हीत कैद झाला होता.
या प्रकरणी बोरिवली जीआरपी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आल्यानंतर सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपीचा शोध घेत होते. पुन्हा 1 मार्च रोजी बोरिवली रेल्वे स्थानकावर चोरी करणारा आरोपी आढळून आला. जीआरपी पोलिसांनी या आरोपीची चौकशी केली असता आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. या प्रकरणी मुंबईतील धारावी परिसरात टेलर काम करणाऱ्या मोहम्मद सिद्दीकी या आरोपीला चोरी केलेल्या मुद्देमालासह अटक करण्यात आली आहे.
हेही वाचा - मुंबई पालिकेची 'ती' कारवाई फक्त दिखावा... माहिती अधिकारात उघड