ठाणे: रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार पूजा श्रीकांत आंधळे (वय २७) ह्या मुंबईतील ताडदेव पोलीस ठाण्यात महिला कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहेत. त्या नेहमी प्रमाणे पोलीस ठाण्यात जाण्यासाठी ३ मे रोजी ११ वाजल्याच्या सुमारास लोकलने महिला डब्ब्यात प्रवास करीत होत्या. त्याच लोकलने चोरटा प्रवीणही प्रवास करीत होता. त्यातच कल्याण रेल्वे स्थानकातील ७ नंबर फलाटावर असलेली लोकल 'सीएसएमटी'च्या दिशेने जाताना कल्याणला थांबली होती. त्यावेळी पूजा ह्या दरवाज्यात उभ्या राहून प्रवास करीत होत्या. लोकल पुढील स्थानकात जाण्यासाठी निघताच चोरट्याने महिला कॉन्स्टेबलच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र खेचून पळ काढला.
सीसीटीव्ही कॅमऱ्यात चोर कैद: या प्रकरणी पूजा आंधळे या महिला कॉन्स्टेबलने कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या अनुषंगाने कल्याण रेल्वे पोलिसांनी ७ नंबर फलाटावरील सीसीटीव्ही आणि तांत्रिक माहितीच्या मदतीने चोरट्याचा शोध सुरू केला. याच दरम्यान गुप्त बातमीदाराने रेल्वे पथकाला चोरट्याची ओळख पटवून तो अंबरनाथ पूर्वेकडील पंचशीलनगर राहत असल्याची माहिती दिली. या माहितीच्या आधारे त्याला अंबरनाथ मधून ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने मंगळसूत्र चोरल्याची कबुली पोलिसांना दिली.
चोरास अटक: त्यानंतर त्याच्याकडून रेल्वे पोलिसांनी चोरीस गेलेले १५ ग्राम वजनाचे ६५ हजार रूपयांचे सोन्याचे मंगळसूत्र जप्त केले. याप्रकरणी प्रवीण पवार याला रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. तसेच त्याने रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत आणखी काही चोरीचे गुन्हे केले आहेत का? याचा तपास रेल्वे पोलीस करत आहेत. मात्र या घटनेनंतर पुन्हा एकदा रेल्वे महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न समोर आला आहे.
चोरांच्या टोळीला अटक: आठवड्याभरापूर्वीच धावत्या एक्सप्रेसमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या बॅगमधून रात्रीच्या सुमारास दागिन्यांंसह रोकड लंपास करणाऱ्या चार सराईत चोरट्यांना कल्याण लोहमार्ग गुन्हे शाखेच्या पथकाने पुणे शहरातून बेड्या ठोकल्या होत्या. हे चोरटे अहमदाबाद–वसई-पुणे या एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या बॅगमधील दागिने, मोबाईल, रोख रक्कम रात्री लंपास करीत होते. या चारही अटक चोरट्यांकडून पाच मोबाईलसह १० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.