मुंबई - महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक 70 चे नगरसेवक कप्तान मलिक यांचा कर्मचाऱ्यांना मारहाण करतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे कर्मचारी रस्त्यात विना परवानगी काम करत असल्याच्या कारणावरून आपण कर्मचाऱ्यांना मारहाण केली, असे स्पष्टीकरण कप्तान मलिक यांनी दिले आहे.
मुंबईत ठिकठिकाणी रस्त्याची कामे सुरू आहेत. ही कामे विविध कंपन्यांना कंत्राटावर दिली आहेत. कप्तान मलिक यांच्या प्रभागातही रस्त्याचे खोदकाम सुरू आहे. नगरसेवक कप्तान मलिक यांनी खोदकाम करणाऱ्या कामगारांकडे कामाचा परवाना मागितला. मात्र, कामगारांकडे परवानगी नसल्यामुळे कप्तान मलिक यांनी कामगारांना मारहाण करण्यास सुरुवात केली. असे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. हा व्हिडिओ एक महिन्यापूर्वीचा आहे.
हेही वाचा - विनयभंगाच्या आरोपानंतर नाशिकच्या डॉक्टरची आत्महत्या; सातव्या मजल्याहून मारली उडी
या कामगारांनी किंवा त्यांच्या अधिकाऱ्यांनी पालिकेची परवानगी घेतली नव्हती. अशा प्रकारे हे लोक पालिकेचे नुकसान करत आहेत. त्यामुळे मला हे पाऊल उचलावे लागले, अशी प्रतिक्रिया कप्तान मलिक यांनी दिली.