मुंबई - हिंदू धर्मातील सर्वात महत्वाच्या साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असणाऱ्या दसरा या सणाचे अनेक अर्थाने महत्व आहे. विजयाची प्रेरणा देणारा आणि छात्रवृत्ती जागृत करणारा हा सण असून, घटस्थापना केल्यानंतर नऊ दिवसांनी येणारा हा सण आहे. तसेच नवरात्र उत्सवाची सांगता दसरा या सणाने होते. हा सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. नवरात्राचा शेवटचा दिवस म्हणजे दसरा. ९ दिवस अधिष्ठान केलेल्या देवीने महिषासूर राक्षसाचा या दिवशी वध केला असे म्हटले जाते. तसेच रामानेही याच दिवशी रावणाचा वध केल्याने या सणाला विजयादशमी असेही म्हटले जाते.
हेही वाचा - नवरात्री विशेष : 'असा' पार पाडतो अंबाबाई मंदिरात नवरात्रोत्सव; पाहा काय आहे परंपरा..
रावणाचे दहन म्हणजेच वाईट वृत्तींचे दहन या दिवशी करावे असे मानले जाते. या दिवशी घरोघरी पूजा-अर्चा करुन शस्त्रांची, लक्ष्मीची आणि घरातील वाहनांची मनोभावे पूजा केली जाते. झेंडूची फुले आणि आंब्याची पाने यांना आजच्या दिवशी विशेष महत्त्व आहे. दाराला झेंडूच्या फुलांचे तोरण बांधले जाते. तसेच आपट्याची पाने सोने म्हणून लुटणे ही पूर्वापार चालत आलेली परंपरा आहे.
- दसरा सणाला शास्त्र आणि शस्त्र पूजनाचे महत्त्व
विजयादशमीला शस्त्र आणि शास्त्र पूजन करण्याबाबत वेगळेवेगळे महत्त्व आहे. प्राचीन काळापासून क्षत्रीय युद्धाला जाण्यासाठी दसरा या दिवसाची निवड करत होते. त्यांचे मानणे असे होते की दसर्याच्या दिवशी केलेल्या युद्धामध्ये विजय निश्चित मिळतो. तसेच व्यापारी लोकं विजयादशमीच्या या पवित्र दिवशी नवीन दुकान, शोरूम इत्यादींचा शुभारंभ करणे शुभ मानतात.
- आपट्यांची पाने वाटणे -
या वृक्षाला अश्मंतक असेही म्हणतात. आपट्याची पाने पित्त व कफ दोषांवर गुणकारी आहेत. विजयादशमीला आपट्यांची पाने परस्परांना दिले जातात. यालाच सोने लुटणे असेही म्हणतात .
- शमी वृक्ष पूजन -
दसऱयाला शमी वृक्ष पूजनाला विशेष महत्त्व आहे. नवरात्रीच्या नऊ दिवसात प्रत्येक दिवशी संध्याकाळी शमी वृक्षपूजन केल्याने आरोग्य व धन संपत्ती प्राप्त होते असे मानले जाते.
- रावणाच्या प्रतिमेचे दहन -
दसऱ्याच्या दिवशी सायंकाळी रावणाच्या प्रतिमेचे दहन केले जाते.
- नवीन कामाची सुरुवात -
दसऱ्याच्या दिवशी काही नवीन काम करण्याची, खरेदी करण्याची, नवीन कपडे घालण्याची प्रथा आहे. या दिवशी गोरगरीबांना भेटवस्तू, उपयुक्त सामान, अन्नधान्य तसेच मिठाई दान केली जाते.
- नऊ दिवसांच्या उपवासाची सांगता -
या दिवशी गोडाधोडाचे पदार्थ बनवून नऊ दिवसांच्या उपवासाची सांगता केली जाते. अनेकजण हे नऊ दिवस कडक उपवास करत असतात.
- माता दुर्गा आणि रामाची पूजा -
दसऱ्याच्या दिवशी महिषासुरला माता दुर्गेने आणि रावणाला श्री रामाने मारले होते, म्हणून त्या दोघांचे पूजन या दिवशी केले जाते.
- तोरण बांधणे -
दसऱ्याच्या दिवशी घरांना, गाड्यांना झेंडूची फुले आणि आंब्यांच्या पानापासून तयार केलेले तोरण बांधले जाते.
- दसरा का साजरा करतात?
याच दिवशी भगवान श्री रामाने रावणाचा वध केला होता. तेव्हापासून हा दिवस विजयोत्सव साजरा करण्यासाठी म्हणून विजयादशमी म्हणून म्हणजेच दसरा म्हणून साजरा केला जातो. विजयाची प्रेरणा देणारा आणि छात्रवृत्ती जागृत करणारा हा सण आहे.
हेही वाचा - Dussehra Special सर्व वाईट शक्तींचे करा दहन, मात्र जाणून घ्या रावणातील हे '7' गुण