मुंबई - मुंबईत कोरोनाचा प्रसार कमी होत असला तरी तो पूर्णपणे गेलेला नाही. तसेच राज्यात कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटचा धोका वाढला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. याबाबत राज्य सरकारने शुक्रवारी (दि. २५ जून) नवीन सरकारी आदेश काढला आहे. त्यानुसार मुंबईतही तिसऱ्या स्तराचे निर्बंध लागू राहतील, असे परिपत्रक पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी काढले आहे. ७ जूनपासून मुंबईत तिसऱ्या स्तराचे निर्बंध असून २८ जूनपासून पुढेही हेच निर्बंध लागू राहतील, असे परिपत्रकात म्हटले आहे.
पॉझिटिव्हीटी दर वाढला
मुंबई महापालिकेच्या हद्दीत गेले दोन आठवडे ३.९६ टक्के इतका पॉझिटिव्हीटी दर आहे. तसेच २६.४ टक्के इतक्या ऑक्सिजन बेडवर रुग्ण आहेत. ११ जून ते १८ जून या आठ दिवसात पॉझिटिव्हिटी रेट ३.७९ टक्के इतका होता. २३.५६ टक्के बेडवर रुग्ण होते. मुंबईत पॉझिटिव्हीटी दर आणि ऑक्सिजनवर असलेल्या रुग्णांची संख्या वाढली आहे. यामुळे मुंबईमध्ये तिसऱ्या स्तराचे निर्बंध लागू राहतील, असे परिपत्रकात म्हटले आहे.
आतापर्यंतचा पॉझिटिव्हिटी दर
मुंबईत ४ ते ११ जून या आठ दिवसांच्या कालावधीत २ लाख ६९ हजर ५६९ चाचण्या करण्यात आल्या त्यापैकी ११ हजार ८७८ रुग्ण पॉझिटिव्ह आले होते. यामुळे पॉजिटिव्हिटी दर ४.४० टक्के इतका होता. याच कालावधीत १२ हजार ५९३ ऑक्सिजन बेड्सपैकी ३ हजार ४१६ बेड्सवर रुग्ण होते. तर ९ हजार १७७ बेड्स रिक्त होते. एकूण बेड्स पैकी २७.१२ टक्के बेड्वर रुग्ण होते. यामुळे मुंबईचा समावेश दुसऱ्या स्तरात झाला होता. ११ ते १८ जून या कालावधीत १२ हजार ५९३ पैकी ९ हजार ६२६ ऑक्सिजन बेड रिक्त होते. २ हजार ९६७ ऑक्सिजन बेडवर रुग्ण होते. मुंबईत २३.५६ टक्के बेडवर रुग्ण असल्याने राज्य सरकारच्या ब्रेक द चैन नियमानुसार मुंबईचा समावेश पहिल्या स्तरात झाला होता.
लोकल रेल्वे अत्यावश्यक कर्मचाऱ्यांसाठीच
मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकल ट्रेनमधून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य कर्मचारी व अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच प्रवास करण्याची मुभा आहे. मुंबईत मागील आठवड्यात पॉझिटिव्हीटी दर कमी झाल्याने सामान्य प्रवाशांना लोकल रेल्वे सुरू करण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, नव्याने आलेला डेल्टा प्लस हा व्हेरियंट झपाट्याने पसरत असल्याने सामान्य नागरिकांना लोकल ट्रेनमधून प्रवास करण्याची मुभा नसणार आहे.
काय सुरू, काय बंद राहणार
- सर्व दुकाने सायंकाळी चार वाजेपर्यंत खुली राहण्यास मुभा
- मॉल, थिएटर, नाट्यगृह बंद
- मैदाने आणि बगीचे सकाळी पाच ते सकाळी नऊ वाजेपर्यंत खुली
- महत्त्वाची खासगी कार्यालय चार वाजेपर्यंत सुरू ठेवता येतील. तर शासकीय कार्यालय ५० टक्के उपस्थितीत सुरू राहण्यास मुभा
- लग्नासाठी केवळ पन्नास लोकांच्या उपस्थितीतीची परवानगी
- अंत्यविधीसाठी २० लोकांना परवानगी
- महत्त्वाच्या बैठकासाठी ५० टक्के उपस्थिती, केवळ बांधकाम स्थळी काम करणाऱ्या मजूर आणि कर्मचाऱ्यांना मुभा असेल.
- शेतीविषयक कामे चार वाजेपर्यंत करण्यास मुभा असेल.
- सायंकाळी पाच वाजेपर्यंत जमावबंदी असेल तर पाच वाजेनंतर संचारबंदी लागू
- जिम, सलून आणि ब्युटी पार्लर सायंकाळी चार वाजेपर्यंत केवळ ५० टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सुरू राहील.
- सार्वजनिक वाहतूक आसन क्षमतेनुसार सुरू राहील.
डेल्टा प्लसचा पहिला मृत्यू
मुंबई, पालघर, सिंधुदुर्ग, जळगाव, रत्नागिरी, ठाणे याठिकाणी कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचे रुग्ण आढळले आहेत. राज्यात डेल्टा प्लस या व्हेरियंटचे २१ रुग्ण आहेत. त्यापैकी शुक्रवारी (२५ जून) रत्नागिरीमध्ये या नव्या व्हेरिएंटचा पहिला मृत्यू नोंदविण्यात आला आहे.
हेही वाचा - vaccination : मुंबईत शुक्रवारी 79 हजार 721 लाभार्थ्यांचे लसीकरण