मुंबई - मुंबईमध्ये मार्च २०२० मध्ये कोरोना विषाणूचा प्रसार सुरु झाला. त्यानंतर रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत होती. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी देशभरात १६ जानेवारी २०२१ पासून लसीकरण मोहीम सुरु करण्यात आली. मुंबईत २०११ च्या जनसंख्येच्या नोंदी प्रमाणे १ कोटी ३० लाख नागरिक आहेत. त्यामधील ९४ लाख नागरिकांना लस देण्याचे उद्दिष्ट सरकाराने पालिकेला दिले होते. पालिकेने १ कोटी ८ लाख ८९ हजार ७२१ नागरिकांना लसीचा पहिला, ९८ लाख ८ हजार ७४८ नागरिकांना लसीचे दोन्ही डोस दिले आहेत. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा परिणाम कमी करण्यासाठी बूस्टर डोस देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार मुंबईमध्ये केवळ १४ लाख ४८ हजार ७८५ नागरिकांना लसीचा बूस्टर डोस देण्यात आला आहे अशी आकडेवारी पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
८३ लाख नागरिक बूस्टर डोसपासून वंचित - मुंबईमध्ये लसीचा पहिला आणि दोन्ही डोस घेण्यासाठी नागरिकांनी भरघोस असा प्रतिसाद दिला. मात्र बूस्टर डोसला नागरिकांनी प्रतिसाद दिलेला नाही. मुंबईमध्ये ९८ लाख ८ हजार ७४८ नागरिकांना लसीचे दोन्ही डोस दिले आहेत. त्यापैकी केवळ १४ लाख ४८ हजार ७८५ नागरिकांना लसीचा बूस्टर डोस देण्यात आला आहे. अद्यापही ८३ लाख ५९ हजार ९६३ नागरिक बूस्टर डोसपासून लसीपासून वंचित आहेत.
मुंबईत लस नाही - मुंबईमध्ये कोव्हीशील्ड, कोवॅक्सीन आणि कोर्बोवॅक्स या लस देण्यात आल्या. मुंबईमध्ये सध्या कोवॅक्सीन या लसीचे केवळ ६ हजार डोस बाकी आहेत. कोव्हीशील्ड आणि कोर्बोवॅक्स या लसीचा एकही डोस शिल्लक नाही. मुंबईत सध्या ४० ठिकाणी लसीकरण सुरु आहे. त्यातील ३६ पालिकेची आणि ४ राज्य सरकारची केंद्र आहेत अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाच्या मुख्य कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी दिली.
मुंबईत ११ लाख ५५ हजार रुग्ण - मुंबईमध्ये मार्च २०२० मध्ये पहिला रुग्ण आढळून आला. गेल्या अडीच वर्षात ११ लाख ५५ हजार ६४ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी ११ लाख ३५ हजार २८५ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर १९ हजार ७४५ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मुंबईत सध्या ३७ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. मुंबईमधील रुग्ण दुपटीचा कालावधी १ लाख ७० हजार ५६७ इतका नोंदवण्यात आलेला आहे. १४ ते २० डिसेंबर या आठवड्यातील पॉजिटिव्हिटी रेट ०.०००४ टक्के इतका आहे.