मुंबई - मुंबई महानगर क्षेत्रात शिक्षण उपसंचालक विभागाने राबविलेल्या अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी तब्बल ९ प्रवेश फेऱ्या घेण्यात आल्या. त्यानंतरही १ लाख ८ हजार ७१ प्रवेशाच्या जागा रिक्त राहील्या आहेत. तर राज्यभरात दोन लाखांच्या जवळपास या जागा रिकाम्या राहिल्या आहेत. यासाठीची माहिती आज विभागाने प्रसिद्ध केली आहे. मागील काही वर्षांत वाट्टेल त्यांना नवीन महाविद्यालयांची मान्यता आणि यंदा वाढविण्यात आलेल्या वारेमाप जागांचे मोठा फटका अनेक अनुदानित महाविद्यालयांना बसल्याचे समोर आले आहे.
हेही वाचा- युतीचे मित्रपक्ष सत्तास्थापनेसाठी आतुर; राज्यपालांची घेतली भेट
जागा रिकाम्या राहिल्या असल्याने ही महाविद्यालये अडचणीत सापडली आहेत. दुसरीकडे लाखो रुपयांचे शुल्क आणि इतर भरमसाठ शुल्कवसुली करणारे अल्पसंख्यांक, स्वायत्त संस्थांची महाविद्यालये मात्र या प्रवेशानंतर गडगंज बनले असल्याचे चित्र पाहावयास मिळाले आहे. मुंबई आणि परिसरात असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयात अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत १ लाख ८ हजार ७१ जागा रिक्त राहिल्या आहेत. राज्यात सर्वाधिक जागा मुंबईत रिक्त आहेत. राज्य सरकारच्या शिक्षण विभागातर्फे अमरावती, औरंगाबाद, मुंबई, नागपूर, नाशिक आणि पुणे या सहा शहरांतील अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबवण्यात आली. प्रवेशासाठी नियमित फेऱ्यांसह विशेष फेरी, प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य अशा एकूण नऊ फेऱ्या राबवण्यात आल्या. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवडयात ही प्रवेश प्रक्रिया संपल्याचे जाहीर करण्यात आले. सहा शहरांतील एक हजार ६०५ शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये मिळून ५ लाख ६० हजार ९६२ जागांवर ही प्रवेश प्रक्रिया राबवण्यात आली.
शाखा निहाय झालेले प्रवेश
शाखा | निश्चित प्रवेश | रिक्त जागा |
कला | २१,६२७ | १६,२२४ |
वाणिज्य | १,३४,७३३ | ४२,५२३ |
विज्ञान | ५९,१०९ | ४६,९२० |
एचएसव्हीसी | ३,२५६ | २,४०४ |
एकूण | २,१८,७२५ | १,०८,०७१ |
राज्यातील विभागनिहाय रिक्त जागा
मुंबई | १,०८,०७१ |
पुणे | ३६,८५८ |
नागपूर | २६,३९५ |
औरंगाबाद | १२,८३१ |
अमरावती | ४,४५१ |
एकुण रिक्त जागा | १, ८८,६०६ |