मुंबई - धावत्या एक्सप्रेसमधील पार्सल डब्यातून चोरी करणाऱ्या एका टोळीला येथील रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. ही टोळी गेल्या काही महिन्यांपासून कल्याणहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एक्सप्रेस गाड्यांमधून पार्सल डब्यातील सामान सायन ते दादर रेल्वे स्थानका दरम्यान रात्रीच्या वेळेस बाहेर फेकून लूट करीत होते. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी शंकर नायडू याला चेन्नई येथून तर विजय जाधव आणि अहमद अकबर अन्सारी या आरोपींना मुंबईतून अटक केली आहे.
अटक झालेले आरोपी हे घाटकोपर स्थानकावरून कल्याण स्थानकापर्यंत लोकलने प्रवास करीत होते. 14 जुलैला कल्याण स्थानकात येणाऱ्या चेन्नई एक्स्प्रेसच्या पार्सल डब्याचे दरवाजे कल्याण स्थानाकातच उघडले जात असल्याची माहिती या आरोपींना होती. कल्याण स्थानकात चेन्नई एक्सप्रेस येताच हे तिन्ही आरोपी पार्सल डब्याच्या जवळ उभे राहून रेल्वे स्थानकातून गाडी निघताच पार्सल डब्यात शिरले होते. त्यानंतर एक्सप्रेस सायन ते दादर स्थानकादरम्यान धावत असताना पार्सल डब्यातील सामान बाहेर फेकून देत होते.
एक्सप्रेस गाडी दादर स्थानकावर आल्यावर तिन्ही आरोपी दादर स्थानकावर उतरून रेल्वे रुळांवर फेकलेले सामान ताब्यात घेऊन टॅक्सीने पळून गेले होते. त्यानंतर पोलीस त्यांच्या शोधात असताना या प्रकरणी पोलिसांनी शंकर नायडू याला चेन्नई येथून तर विजय जाधव आणि अहमद अकबर अन्सारी या आरोपींना मुंबईतून अटक केली आहे. याप्रकरणी पोलीस आणखी 2 फरार आरोपींचा शोध घेत आहेत.