मुंबई : रत्नागिरीतील बारसू रिफायनरी या वादग्रस्त प्रकल्पाच्या जागेच्या सर्वेक्षणाची प्रक्रिया यापूर्वीच सुरू झाली आहे. मात्र, या सर्वेक्षणाला रत्नागिरीतील स्थानिक नागरिक आणि पर्यावरणवादी संघटनांनी विरोध केला आहे. रत्नागिरीतील बारसू, राजापूर गावात स्थानिक नागरिक आणि पर्यावरणवादी संघटना विरोध करत आहेत. या प्रकल्पाला विरोध करणाऱ्या नागरिकांना पोलिस बळाचा वापर करून धमकावले जात असल्याचा आरोप केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार विनायक राऊत यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या रिफायनरीच्या वादावरून मातोश्रीवर खासदार संजय राऊत, खासदार विनायक राऊत, आमदार भास्कर जाधव, आमदार सचिन अहिर यांची बैठक पार पडली. या कोकणातील नेत्यांमध्ये तब्बल चार तास बैठक झाली. या बैठकीनंतर खासदार विनायक राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला.
बेदम मारहाण : त्यावर बोलताना खासदार विनायक राऊत म्हणाले की, "उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची पंचाईत झाली नाही. आज सत्तेत असलेल्या सरकारने हजारो कोटी रुपये भूमाफियांच्या खिशात घालण्याचा डाव आखला आहे. बारसू परिसरातील रिफायनरीला स्थानिक ग्रामस्थांचा तीव्र विरोध आहे. हा विरोध मोडून काढण्यासाठी महिला ग्रामस्थ, ज्येष्ठ नागरिक, लहान मुलांना भर उन्हात बेदम मारहाण करण्यात आली. तेथे गेलेल्या पत्रकारांचाही पाठलाग करण्यात आला. त्यांना राजापूरला नेण्यात आले असा आरोप राऊत यांनी केला आहे.
पत्रकारांचा पाठलाग : 'बारसू परिसरात पोलिसांमार्फत सुरू असलेल्या अत्याचाराची बातमी जगासमोर येऊ नये, वार्तांकन करण्यापासून पत्रकारांचा पाठलाग केला जात आहे. प्रकल्पाला विरोध करणाऱ्या नागरिकांंना अत्यंत क्रूरपणे वागणूक दिली जात आहे. इथे रिफायनरी आणून तिथल्या भूमाफियांचे खिसे भरण्याचा सरकारतचा हेतू साध्य आहे. पोलिसांचा वापर करण्यात येत असून मुंबईत राहणाऱ्या नागरिकांच्या घरी पोलिस जात आहेत. त्यांच्या घरावर नोटीस चिटकवत आहे. जे बोहेर गावी गेलेले आहे त्यांना रेल्वे स्थानकावर उतरल्यावर जेरबंद करण्यात येत' असल्याचा आरोप खासदार विनायक राऊत यांनी केला आहे.
पोलिसांच्या माध्यमातून मनमानी : 'कोणत्याही परिस्थितीत कायद्याची अंमलबजावणी न करता पोलिसांच्या माध्यमातून तेथे सुरू असलेली मनमानी अत्यंत निषेधार्ह आहे. त्या बारसूच्या स्थानिक लोकप्रतिनिधींनी आजपर्यंत तीन वेळा मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. आम्हाला बैठकीची वेळ द्या, आमचे म्हणणे ऐकून घ्या. पण, तिन्ही पत्राला मुख्यमंत्र्यांनी कचऱ्याची टोपली दाखवली आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकही बैठक घेतली नाही. सरकारने लोकांचे म्हणणे ऐकून घेण्याचा प्रयत्न केला नाही. उलट पोलिसांना आदेश दिल्याचे ऐकायला मिळते' असे राऊत म्हणाले.
हेही वाचा - Barsu Refinery Project : बारसू रिफायनरीबाबत शरद पवार आणि उदय सामंत यांच्यात फोनवर चर्चा