मुंबई - केंद्र सरकारच्या नवीन कृषी कायद्यांमुळे शेतकऱ्यांचे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी राज्य सरकारने स्वतंत्र कायदा करावा, अशी मागणी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केली आहे. कायद्यामध्ये शेतमाल खरेदीच्या व्यवहारासाठी किमान आधारभूत किंमत अनिवार्य करण्यासह शेतकरी हिताच्या विविध तरतुदींचा समावेश असावा, असेही त्यांनी म्हटले.
चव्हाण यांनी आज रात्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना या संदर्भातील मागणीचे पत्र दिले. यावेळी राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाडदेखील उपस्थित होत्या. केंद्राच्या कृषी कायद्यांमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी देशातील अनेक राज्यांनी चांगले कायदे केले आहेत. या कायद्यांमुळे तेथील शेतकरी व ग्राहकांना दिलासा मिळणार आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारनेसुद्धा नवीन कायदा करून शेतकऱ्यांना संरक्षण देण्याची भूमिका स्वीकारली पाहिजे, असे चव्हाण यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.
...या तरतुदींचा राज्याच्या कृषी कायद्यात समावेश असावा
खासगी खरेदीदारांना कृषिमालाच्या खरेदीचे करार व व्यवहार किमान आधारभूत किंमतीपेक्षा कमी किंमतीने करण्यास प्रतिबंध घालणे, शेतमाल खरेदी-विक्रीबाबतचे करार व व्यवहारांसाठी शेतकऱ्यांची संमती अनिवार्य करणे, फसवणूक झाल्यास शेतकऱ्यांना दिवाणी न्यायालयात दाद मागण्याचा हक्क प्रदान करणे, शेतकऱ्यांची फसवणूक अथवा छळ केल्यास दीर्घ मुदतीचा कारावास, तसेच मोठ्या रक्कमेच्या आर्थिक दंडाची तरतूद करणे, व्यापाऱ्यांना शेतमालाचा अमर्याद साठा करता येणार नाही यासाठी साठवण क्षमतेवर मर्यादा घालणे, कृषीमालाच्या व्यवहारांसाठी इलेक्ट्रॉनिक ट्रेडिंग प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून पारदर्शक लिलाव व ऑनलाइन पेमेंटची सुविधा प्रदान करणे आदी तरतुदींचा राज्याच्या कृषी कायद्यात समावेश असावा, अशी मागणी अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रातून केली.
हेही वाचा- 'मुंबईकरांच्या सेवेतील एसटी कर्मचाऱ्यांना रोज मिळणार २२५ रुपये भोजन भत्ता'