मुंबई - राज्य सरकार मुंबईची वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी जलवाहतूक सुरू करण्याच्या तयारीत आहे. ऑक्टोबर महिन्यापासून ती सुरू होण्याची शक्यता असून हा प्रकल्प दक्षिण मुंबईतून उपनगरातील इतर ठिकाणांना जोडणार आहे. मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष संजय भाटिया यांनी ही माहिती दिली आहे.
महाराष्ट्र मेरीटाइम बोर्ड, सिडको, एमबीपीटी आणि जेएनपीटीचा वाहतूक विभाग या संस्था एकत्र येत हा प्रकल्प राबवणार आहे. या वाहतुकीसाठी ५ स्पीड बोटी विकत घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एका बोटीची किंमत ७ कोटी इतकी आहे. तर या ५ बोटींसाठी ३५ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. दक्षिण मुंबईहून मांडवा, ठाणे, ऐरोली, वाशी, नेरुळ, बेलापूर या ठिकाणी या बोटी वाहतूक करणार आहेत.
स्पीड बोटीमध्ये एकावेळी १५ ते २० जण बसू शकतील. दक्षिण मुंबईतून अर्ध्या तासात इच्छुक स्थळी पोहोचता येणार आहे. या सेवेमुळे प्रवाशांचा वेळ आणि गर्दीची कटकट मिटणार आहे. ही जलवाहतूक सुरू करण्यासाठी जेट्टीची स्थिती, प्रवाशांची सुरक्षितता आणि इतर बाबींचा विचार करून जलप्रवासाचा मार्ग ठरवण्यात येणार आहे.
या जलवाहतूकीसाठी रस्ते मार्गाने प्रवासासाठी आकारण्यात येणाऱ्या दराएवढेच दर असतील असे सांगण्यात आले. जलप्रवासामुळे मुंबई आणि उपनगरातील अंतर कमी होणार आहे. एका स्पीडबोटमध्ये सुमारे २० प्रवासी बसण्याची क्षमता असेल. नियोजनाप्रमाणे सर्व कामे पूर्ण झाल्यास ऑक्टोबरपासून ही जलवाहतूक सेवा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष संजय भाटिया यांनी दिली.