मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा गणेशोत्सव हा अत्यंत साध्या पद्धतीने साजरा होत आहे. बाप्पाच्या उंच मूर्तीसाठी मुंबईतील अनेक मंडळ ही प्रसिद्ध आहेत. यंदा मात्र मूर्तीबाबत नियम असल्यामुळे छोट्या मूर्ती या मंडळात विराजमान झाल्या होत्या. मुंबईत अशाच एका सर्वात लहान मूर्तीची चर्चा आहे. साकिनाका येथील ओम सिद्धिविनायक मित्र मंडळाने यंदा मुंबईतील सर्वात छोट्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. ही मूर्ती इतकी लहान आहे, की बाप्पाच्या दर्शनासाठी भक्तांना भिंगाचा वापर करावा लागत आहे. कारण, ही मूर्ती केवळ 9 मिलीमीटर उंचीची आहे.
मुंबईत टिश्यू पेपरपासून गणपती मूर्तीची स्थापना करणारे आणि संपूर्ण गणेशोत्सव पर्यावरणपूरक करणारे गणपती मंडळ म्हणून ओम सिद्धिविनायक मित्र मंडळ प्रसिद्ध आहे. यंदा या मंडळाने अवघी 9 मिलीमीटर उंचीची श्रींची उभी मूर्ती विराजमान केली आहे. ही मूर्ती पेन्सिलच्या टोकावर कोरण्यात आला आहे. या बाप्पाचे भिंगामधून दर्शन घ्यावे लागते. यंदाही मंडळाने पूजेची मूर्ती कागदाची तर ही ही मूर्ती पेन्सिलवर साकारुन पर्यावरण पूरक गणेशोत्सवाचा संदेश दिला आहे.
दरवर्षी आम्ही आमच्या मंडळात 20 ते 22 फुटांची कागदी मूर्तीची स्थापना करत असतो. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आणि सरकारच्या नियमांचे पालन म्हणून छोटी मूर्ती बसवली आहे. मात्र, विशेष आकर्षण म्हणून आम्ही पेन्सिलच्या टोकावर बाप्पाची सर्वात छोटी मूर्ती तयार केली आहे. पेन्सिलच्या टोकावरील मूर्ती ही मागच्या वर्षीच्या मूर्तीचे प्रतिरुप आहे, अशी माहिती ओम सिद्धिविनायक मित्र मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश खानविलकर यांनी दिली.
यावर्षी भक्तांना प्रसादात व्हिटॅमिन सीच्या गोळ्या मंडळाकडून वाटप करण्यात येत आहेत. पूजेच्या मूर्तीचे विसर्जन मंडळाच्या परिसरात तलाव उभारून करणार असल्याचेही खानविलकर यांनी सांगितले.
हेही वाचा - ठरलं..! 'ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात विद्यार्थ्यांची होणार घरातूनच अंतिम वर्षाची परीक्षा'