मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केला. त्यानुसार भाजप, शिंदे गटाला 48 जागा सोडण्यास तयार आहे. निवडणुकीला अजून वर्षभराचा अवधी शिल्लक आहे. आगामी निवडणुकीपर्यंत भाजप 288 जागा चिन्हावर लढवेल तोपर्यंत शिंदे गटाचा नामोनिशान मिटेल असा खोचक टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शिंदे सेनेला लगावला. मुंबईत प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते.
शिंदे गट तोपर्यंत टिकणार नाही : राज्यातील सत्ता संघर्षावरील सर्वोच्च न्यायालयात सुनावणी संपली आहे. केव्हाही निर्णय येण्याची शक्यता असताना राज्यात निवडणुकीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला सर्वच राजकीय पक्षांकडून आखला जातो आहे. भाजपकडून चंद्रशेखर बावनकुळे यांनी, भाजप 288 पैकी 240 जागा लढवणार असे सांगताना शिंदे गटाला केवळ 40 जागा देणार असल्याचे सुतोवाच केले. बावनकुळे यांच्या भाषणातील व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात जयंत पाटील यांनी यावरून खिल्ली उडवताना, भाजप महाराष्ट्रात निवडणूका लढवेल, महाविकास आघाडीच्या समोर फक्त एकटा असेल. शिंदे गट तोपर्यंत टिकेल असे मला वाटत नाही, अशी शक्यता वर्तवली.
मित्र पक्षासोबत भाजपने घात केला : स्थानिक प्रादेशिक पक्ष, राज्य स्तरावरील पक्ष, त्यांचे अस्तित्व भाजपला कदापि मान्य नाही. प्रादेशिक पक्षांमुळे मत विभागणीची भाजपला धास्ती आहे. स्थानिक पातळीवरील पक्षांना संपवण्याचा प्रयत्न सुरु आहे. देशातील प्रादेशिक पक्ष कशाप्रकारे संपवले याची अनेक उदाहरणे आहेत. शत्रू सोडा मित्र पक्षासोबत देखील भाजपने घात केला आहे. त्यांच्या उमेदवारांवर कारवाया करुन नामोहरम करण्याची भाजपची पद्धत असल्याचा घणाघात चढवला.
शिंदे गटाला 48 जागा : निवडणुका जाहीर होण्यास अजून अवधी शिल्लक आहे. तेव्हाच, भाजपने निवडणुकीच्या फॉर्म्युल्यात शिंदे गटाला 48 जागा देण्याचे जाहीर केले आहे. जशा निवडणुका जवळ येतील, त्यानुसार जागा वाढवून मागण्याचा प्रयत्न होईल. शिंदे यांनी बंडखोरी केल्यापासून शिंदे गट राहणार की नाही, असा सर्वसामान्यांच्या मनात प्रश्न आहे. यदाकदाचित राहिल्यास शिंदे गटाला 48 पैकी निवडून येणाऱ्या जागांचे सर्वेक्षण भाजपकडून केले जाईल. हमखास सोडून येणाऱ्या जागा वगळता, पर्याय देण्याबाबत सल्लामसलत करतील. शेवटच्या क्षणी एक एक करुन शिवसेनेच्या किंवा शिंदे गटाच्या सर्व जागांवर दावा करतील. भाजपच्या चिन्हांवर निवडणूक लढवण्यास सांगितले जाईल. निवडणूक येईपर्यंत भाजपकडून शिंदे गटाचे संपूर्ण अस्तित्व संपवून टाकेल, असा टोला जंयत पाटील यांनी लगावला.