मुंबई - 'तौत्के' चक्रीवादळामुळे आज (17 मे) सकाळी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील छत उडाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मात्र, या घटनेत कसल्याही प्रकाराची जीवितहानी झालेली नाही. रेल्वेच्या सतर्कतेमुळे छत उडालेल्या ठिकाणच्या खालील बाजूस प्रवाशांना मज्जाव करण्यासाठी सुरक्षा दोरी बांधण्यात आली.
दुर्घटनेत जीवितहानी नाही
'तौत्के' चक्रीवादळ सकाळपासून मुंबई दाखल झाले आहे. त्याचा फटका मध्य आणि पश्चिम रेल्वेला बसला आहे. लोकल रेल्वे गाड्यांवर आणि रेल्वे रूळांवर झाडे कोसळी आहेत. त्यामुळे रेल्वे वाहतूक ठप्प झाली. पावसामुळे अनेक रेल्वे गाड्यांच्या ओव्हर हेडमध्ये तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे काही कालावधीसाठी मध्य आणि हार्बर मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत झाली. तसेच, सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास वादळ वाऱ्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील लोहमार्ग पोलीस ठाणे आणि तिकीट खिडकी येथील छप्पर उडाले. त्यानंतर तत्काळ रेल्वे पोलीस आणि आरपीएफ यांनी छत उडालेल्या ठिकाणच्या खालील बाजूस प्रवाशांना मज्जाव करण्यासाठी सुरक्षा दोरी बांधली. रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही.
आतापर्यंत १८२ झाडे कोसळली
तौक्ते वादळ मुंबईत धडकले. त्यामुळे मुंबईत रविवारी (16 मे) रात्रीपासून पावसाला सुरुवात झाली. आज सकाळी ८ वाजेपर्यंत कुलाबा येथे १७.४ मिलिमिटर, तर सांताक्रुझ येथे ११.९ मिलिमिटर पावसाची नोंद झाली. या वादळामुळे आतापर्यंत एकूण १८२ झाडे कोसळली आहेत. तर रेल्वे परिसरातसुद्धा झाड्यांच्या फांद्या रेल्वे स्थानकांवर आणि रेल्वे रूळावर कोसळल्या आहेत. त्यामुळे सकाळपासून रेल्वे स्थानकांवर आणि रेल्वे मार्गावर सुरक्षा वाढविण्यात आली आहे.
दरम्यान, मुंबईसह ठाण्यात देखील तौक्ते चक्रीवादळाचा प्रभाव पाहायला मिळत आहे. काल रात्रीपासूनच ठाण्यामध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली आहे. वादळामुळे अनेक झाडे उन्मळून पडली आहेत. ठाण्यात 13 ठिकाणी झाडे कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. या घटनेमध्ये 3 ठिकाणी वाहनांचे नुकसान झाले आहे.
वादळामुळे दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू
वादळामुळे खळ्यातील झोपडीवर चिंचेचे झाड कोसळून दोन सख्ख्या बहिणींचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना जळगावच्या अमळनेर तालुक्यातील अंचलवाडी येथे घडली.
हेही वाचा - तौक्ते चक्रीवादळ; ठाण्यात पावसाला सुरुवात, झाडे कोसळून वाहनांचे नुकसान