मुंबई - राजधानी मुंबईमध्ये गेल्या वर्षभरापासून कोरोनाचा प्रसार आहे. फेब्रुवारीपासून यात पुन्हा वाढ झाली आहे. कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. लहान मुलांना देखील मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. 11 मार्च ते 3 एप्रिल या 24 दिवसांच्या कालावधीत 19 वर्षाखालील तब्बल 6 हजार 372 मुले कोरोना पॉझिटिव्ह आली आहेत. मात्र, या वयोगटातील मृत्यूचे प्रमाण नगण्य असल्याचे समोर आले. मृत्यूचे प्रमाण कमी असले तरी लागण होण्याचे प्रमाण वाढले असल्याने लहान मुलांची विशेष काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
कोरोना वाढला -
मुंबईत गेल्या वर्षी 11 मार्चला कोरोनाचा पहिला रूग्ण आढळला होता. या वर्षी 11 मार्चला कोरोनाच्या प्रसाराला एक वर्ष पूर्ण झाले. त्यादिवशी मुंबईत एकूण 3 लाख 38 हजार 631 कोरोना रूग्णांची नोंद झाली होती. तर, 11 हजार 515 मृत्यूची नोंद झाली होती. 3 एप्रिलपर्यंत 4 लाख 32 हजार 192 कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे तर, 11 हजार 759 मृत्यूची नोंद झाली आहे. गेल्या 24 दिवसात 93 हजार 563 नवीन कोरोना रूग्णांची नोंद झाली असून 209 रूग्णांचा मृत्यू झाला आहे.
24 दिवसात 6 हजार 372 लहान मुले पॉझिटिव्ह -
मुंबईत कोरोनाचा प्रसार होत असताना त्याची लागण लहान मुलांनाही होत आहे. 11 मार्चपर्यंत 0 ते 9 वयोगटातील 5 हजार 59 आणि 10 ते 19 वयोगटातील 13 हजार 138, अशी एकूण 18 हजार 197 मुले कोरोना पॉझिटिव्ह आली होती. 3 एप्रिलपर्यंत 0 ते 9 वयोगटातील 7 हजार 20 आणि 10 ते 19 वयोगटातील 17 हजार 549, अशी एकूण 24 हजार 569 मुले कोरोना पॉझिटिव्ह आली आहेत. ही आकडेवारी पाहिल्यास गेल्या 24 दिवसात 19 वर्षाखालील 6 हजार 372 लहान मुले कोरोना पॉझिटिव्ह आली आहेत. गेल्या 24 दिवसात 0 ते 9 वयोगटातील 4 हजार 411 मुले पॉझिटिव्ह आली आहेत.
मृत्यूचे प्रमाण नगण्य -
11 मार्च 2020 ते 11 मार्च 2021 या वर्षभराच्या कालावधीत 0 ते 9 वयोगटातील 17 आणि 10 ते 19 वयोगटातील 31, अशा एकूण 48 मुलांचा मृत्यू झाला होता. यावर्षी 3 एप्रिलपर्यंत 0 ते 9 वयोगटातील 17 आणि 10 ते 19 वयोगटातील 32, अशा एकूण 49 मुलांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. ही आकडेवारी पाहता गेल्या 24 दिवसात एकाच मुलाचा मृत्यू झाला आहे. यामुळे या वयोगटातील मृत्यूची संख्या नगण्य असल्याचे दिसते.
लहान मुलांची कोरोनावर मात -
कडक लॉकडाऊन दरम्यान कोरोनाच्या भीतीने मुंबईकर स्वत:ही घराबाहेर पडले नाहीत आणि त्यांनी आपल्या लहान मुलांनाही घराबाहेर जाऊ दिले नव्हते. लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यानंतर मुंबईकरांनी आपल्या लहान मुलांना बाहेर खेळण्यास परवानगी दिली. खेळताना मास्क न वापरणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन न होणे, खेळताना एकमेकांच्या संपर्कात येणे, यामुळे लहान मुलांना कोरोनाची लागण होत आहे. घरातील मोठ्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याने त्या घरातील लहान मुलांनाही कोरोनाची लागण होत आहे. कोरोनाची लागण होत असली तरी ती मुले कोरोनावर मात करत आहेत. या मुलांच्या मृत्यूचे प्रमाण खूपच कमी आहे. मुंबईकरांनी लहान मुलांची काळजी घेण्याची गरज असून घाबरून जाऊ नये, असे आवाहन महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केले आहे.
घाबरून जाऊ नका -
कोरोनाच्या प्रकारामध्ये बदल झाल्याने कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. त्यात तरूण आणि लहान मुलांनाही कोरोनाची लागण होत आहे. लहान मुलांना कोरोनाची लागण होत असली तरी नागरिकांनी घाबरून जाऊ नये. आरोग्य विभाग सज्ज असल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाच्या टास्क फोर्सचे सदस्य डॉ. तात्याराव लहाने यांनी दिली.
हेही वाचा - पहिली ते आठवीपर्यंतच्या मुलांना विना परीक्षा पुढच्या वर्गात प्रवेश, शिक्षणमंत्र्यांची घोषणा