मुंबई - कोरोनाने निर्माण केलेले महाभयंकर संकट अद्यापही टळलेले नसताना शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड मात्र १५ जूनपासूनच शाळा ऑनलाईन सुरू करण्याच्या हट्टाला पेटल्या आहेत. यासाठी त्यांनी एक पाऊलही मागे हटणार नसल्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे अनेक शिक्षणाधिकाऱ्यांचीही तारांबळ उडाली असल्याचे समजते.
राज्यातील शहरी भागांमध्ये १५ जूनपासून आणि ग्रामीण भागातील शाळा या २६ जूनपासून सुरू करण्याचा कार्यक्रम तयार करण्याचे निर्देश शालेय शिक्षण मंत्र्यांनी आपल्या विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. यासाठी काही अधिकाऱ्यांनी या शाळा ऑनलाईन सुरू करण्यासाठी घाई करू नये, अशा सूचना केल्या होत्या. तर दुसरीकडे शिक्षक आमदारांनीही यासाठी पत्र लिहून शाळा सुरू करण्याची घाई करू नये, अशी मागणी केली आहे. मात्र, याकडेही शालेय शिक्षणमंत्र्यांनी दुर्लक्ष केल्याचे सांगण्यात येते. यामुळे राज्यात शाळा ऑनलाईन सुरू करण्यासाठीचे वेळापत्रक कोणत्याही क्षणी जाहीर केले जाणार असल्याचे मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी सूत्रांंकडून सांगण्यात आले आहे.
राज्यात ऑनलाईन शाळा सुरू करण्यापूर्वी ग्रामीण आणि शहरी भागातील प्रत्येक शाळांमध्ये पाठ्यपुस्तके पुरविण्यासाठीचे नियोजन जोरात सुरू आहे. शहरी भागात हे काम वेगाने सुरू असले तरी ग्रामीण भागात अद्यापही त्याला गती आली नाही. यामुळे ही पुस्तके उशिरा मिळाल्यास ग्रामीण भागातील विद्यार्थी एकाच वेळी ऑनलाईन शिक्षण आणि पाठ्यपुस्तकांनाही मुकण्याची भीती व्यक्त केल जात आहे.
ग्रामीण भागातील पालकांकडे मोबाईल, टीव्ही आणि तत्सम यंत्रणा उपलब्ध नसल्याने त्याचा एक सर्व्हे करावा, अशी मागणी नुकतीच शिवसेनेच्या एका आमदाराने केली होती. त्यावरही अद्याप कोणता निर्णय घेण्यात आला नाही. यामुळे राज्यातील वास्तव लक्षात न घेता शाळा ऑनलाईन सुरू केल्यास मोठा फज्जा उडण्याची शक्यता जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे.