मुंबई - गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शुक्रवारी नवी दिल्लीत शरद पवारांची भेट घेतली. त्यावर प्रसार माध्यमांनी सचिन वाझे प्रकरणात शरद पवार देशमुखांच्या मंत्री पदाचा राजीनामा घेणार असल्याचे वृत्त चालवले. तसेच शरद पवार देशमुखांवर नाराज असल्याचेही सांगण्यात आले. त्याच पार्श्वभूमीवर देशमुखांनी पवारांची भेट घेतली असून ते राजीनामा देणार असल्याच्या बातम्या प्रसारित केल्या. यावर गृहमंत्री देशमुख यांनी ट्विट करून खुलासा केला आहे.
अँटिलिया स्फोटके आणि मनसूख हिरेन मृत्यू प्रकरणात मुंबई पोलीस दल जोरदार चर्चेत आले. या प्रकरणात एनआयने तपास अधिकारी यांना अटक केल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी वाझेंची बदली आणि नंतर निलबंन जाहीर केले. तसचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी मुंबई पोलीस आयुक्तांचाही उचल बांगडी केली. या प्रकरणात गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची विरोधकांनी मागणी केली. त्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिल्लीत पवारांची भेट घेतल्यावरून इलेक्ट्रॉनिक प्रसार माध्यमांनी देशमुख राजीनामा देणार असल्याचे वृत्त प्रसारित केले होते.
माझ्या राजीनाम्याच्या बातम्यात तथ्य नाही-
यावर देशमुख म्हणाले की, माध्यमात माझ्या राजीनाम्याच्या बातम्या चालवल्या जात त्यामध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे जाहीर केले. तसेच मी विदर्भातील महत्वपूर्ण अशा मिहान प्रकल्पासंदर्भात शरद पवार यांची भेट घेतली, तसेच २ दिवसांत मनसुख हिरेन व सचिन वाझे प्रकरणाविषयी एटीएस आणि एनआयएने केलेल्या तपासाची चर्चा झाली असल्याचीही माहिती त्यांनी ट्विटवरून दिली आहे.
राष्ट्रवादीने यापूर्वीच जाहीर केले-
या संपूर्ण प्रकरणात गृहमंत्रालय असलेल्या राष्ट्रवादीने पक्षाची बैठक घेतली होती. त्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुखांचा राजीनामा घेणार नसल्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जाहीर केले होते. तत्पूर्वी शऱद पवार आणि मुख्यमंत्री ठाकरे यांच्यातही चर्चा झाली होती. त्यानंतर परबिरसिंह यांची पोलीस आयुक्त पदावरून उचलबांगडी करण्यात आली.