मुंबई - सुशांतसिंह राजपूत आत्महत्ये संबंधित ड्रग्ज प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने आज विशेष एनडीपीएस न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. 12 हजार पानांच्या या आरोप पत्रात अभिनेत्री रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शोविक आणि अन्य 31जण आरोपी आहेत. त्यात मुंबईतील काही ड्रॅग पेडलर्सचाही समावेश आहे. रिया, शोविक, दीपेश सावंत, सॅम्युअल मिरांडा आणि क्षितिज प्रसाद सर्वांना एनसीबीने अटक केली होती. ड्रग्ज जप्त केल्याचा आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त केल्याचा अहवाल, फॉरेन्सिक अहवाल, साक्षीदारांच्या निवेदनांच्या आधारे हे आरोपपत्र तयार करण्यात आले आहे. या आरोपपत्रासंदर्भात एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे न्यायालयात दाखल झाले होते.
रिया होती कोठडीत -
ड्रग्ज प्रकरणी न्यायालयीन कोठडी सुनावलेल्या रिया चक्रवर्तीला ७ ऑक्टोबरला मुंबई उच्च न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केलेला आहे. रियासोबतच सुशांतचा मॅनेजर सॅम्युअल मिरांडा आणि दिपेश सावंत यांनाही न्यायालयाने जामीन मंजूर केला. या प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेला रियाचा भाऊ शोविक चक्रवर्ती आणि अब्दुल परिहार यांना त्याच दिवशी जामीन देण्यास न्यायालयाने नकार दिला होता. रियाला एक लाख आणि अन्य दोघांना 50 हजारांच्या जात मुचकल्यावर हा जामीन मंजूर झाला होता. काही दिवसांनंतर शोविकला देखील जामीन मिळाला.
काय आहे प्रकरण -
बॉलीवुड अभिनेता सुशांतसिंह राजपूतने १४ जून २०२० आत्महत्या केली. त्याची आत्महत्या नसून हत्या असल्याचा संशय त्यांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात आली. सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्तीच्या चौकशी दरम्यान ड्रग्ज अँगल समोर आला होता. एनसीबीने रिया चक्रवर्ती, सॅम्युअल मिरांडा आणि रियाचा भाऊ शोविक चक्रवर्तीचे यांचे ड्रग्स माफियांसोबत संबंध असल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर एनसीबीने याच प्रकरणात जैद या आरोपीला अटक केली होती.