मुंबई - राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, टाळेबंदी, राजकीय कुरघोड्या याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात अडीच तास बैठक झाली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकात महत्वाची बैठक मंगळवारी (दि. 7 जुलै) सायंकाळी साडेसहा ते सातच्या दरम्यान सुरू झाली. या बैठकीत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे आणि परविहन मंत्री अनिल परब देखील उपस्थित होते.
या बैठकीत शिवसेनेच्या पारनेरच्या नगरसेवकांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षप्रवेश, पोलिस उपायुक्तांच्या बदल्या आणि स्थगिती, तसेच कोरोना, टाळेबंदी संदर्भातील सरकारच्या धोरणवरुन महत्त्वाची चर्चा झाल्याचे समजते.
मुख्यमंत्र्यांसोबतची बैठक संपवून गृहमंत्री अनिल देशमुख बैठकीतून बाहेर पडल्यानंतर राज्याचे पोलीस महासंचालक मुख्यमंत्र्यांकडे बैठकीला पोहचले. त्यानंतर पुढील तासभर राज्य पोलीस महासंचालक सुबोध कुमार जायसवाल यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोबत बैठक झाली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली हेती. महाविकासआघाडीच्या सत्तास्थापनेनंतर शरद पवार मातोश्रीवर जाण्याची ही दुसरी वेळ होती. पोलिसांच्या बदल्या आणि पारनेरमध्ये शिवसेनेचे नगरसेवक फोडल्याचे एक कारण यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाराज आहेत. त्यामुळे शरद पवार यांना मातोश्रीवर यावे लागल्याचे सांगण्यात येत आहे.
हेही वाचा - खूशखबर; राज्यात पोलिसांच्या 10 हजार जागा भरणार