मुंबई - मालवणी घटनेनंतर चुनाभट्टीतील टाटानगर परिसरातील गिरणी कामगारांची इमारत पुन्हा चर्चेत आली आहे. मागच्या 15 वर्षांपासून येथील रहिवाशी जीव मुठीत घेऊन राहत आहेत. राहण्यासाठी दुसरा पर्याय नसल्याने काय करायचे? असा प्रश्न येथील रहिवाशांसमोर निर्माण झाला आहे. त्यामुळे हे रहिवासी याच जीर्ण इमारतीत आपल्या संसाराचा गाडा हाकत आहेत.
इमारतीची अवस्था अत्यंत दयनीय -
1960मध्ये स्वदेशी मिलमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी ही तीन मजली इमारत बांधण्यात आली. त्यावेळी या इमारतीमध्ये एकूण 122 कुटूंब राहत होती. मुंबईतील गिरण्या हळूहळू बंद पडू लागल्या. त्यातच 2001मध्ये स्वदेशी मिललाही टाळे लागले. गिरणी बंद झाल्याने या इमारतीकडे कंपनीने लक्ष देणे टाळले. यानंतर काही वर्षातच या इमारतीची अवस्था अत्यंत दयनीय झाली. या इमारतीला बाहेरून पाहिले की आतमध्ये जाण्याची हिंमत होत नाही. बाल्कनीचे तुटलेले कठडे, तुटलेले सिलिंक या इमारतीच्या दयनीयतेची साक्ष देतात.
हेही वाचा - पुढच्या 48 तासांत मुंबईत जोरदार पाऊस होणार; हवामान खात्याचा अंदाज
जीव गेल्या प्रशासनाला जाग येणार का?
ज्या रहिवाशांकडे पैसे होते ते रहिवासी दुसरीकडे राहायला गेले. मात्र, ज्यांच्याकडे पुरेसे पैसे नाही? असे रहिवासी जुन्याच ठिकाणी राहू लागले. या इमारतीमध्ये सध्या 45 कुटूंब वास्तव्य करत आहेत. या इमारतीचे पिलर गंजले आहेत. पिलरमधून बाहेर येणाऱ्या गंजलेल्या सळ्या या इमारतीची दयनीय कहाणी सांगण्यास पुरेशा आहेत. एखादा वयोवृद्ध व्यक्ती काठीचा आधार घेऊन जसा उभा असतो तशीच ही इमारत टेकूचा आधार घेवून उभी आहे. धोकादायक इमारतींसदर्भात मुंबई मनपाकडून नोटी दिली जाते. मात्र, पर्यायी व्यवस्था केली जात नाही. पावसाळ्यात जरी डोक्यावर छत असले तरी छताच्या तुटक्या फटीतून पाऊस घरात प्रवेश करतोच. यामुळे पावसाळा आला की नागरिकांची दैना होते. यामुळे जीव गेल्यानंतर प्रशासनाला तरी जाग येणार का? असा सवाल नागरिकांनी केला आहे.
हेही वाचा - राज्यात अनलॉकला सुरुवात; कोरोना रुग्णसंख्येत काही अंशी वाढ