मुंबई : पतीने अगोदर पत्नीला मिठी मारून नंतर धावत्या लोकलमधून फेकून दिल्याची घटना समोर आलेली आहे. मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावरील गोवंडी स्थानकाजवळ ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे.
एका महिन्यांपूर्वी झाले होते लग्न -
या प्रकरणातील मुख्य आरोपी अन्वर अली शेख याने एक महिन्यापूर्वी पूनम चव्हाण या महिलेसोबत लग्न केले होते. पूनम चव्हाण हिचे हे दुसरा लग्न आहे. पहिल्या पतीपासून तिला तीन वर्षांची मुलगीसुद्धा आहे. एक महिन्यापूर्वी लग्न झाल्यानंतर दोघे पती-पत्नी हे कामाच्या शोधात होते. मात्र, दोघांना काम मिळत नसल्यामुळे या दोघांमध्ये वाद होण्यास सुरुवात झाली होती.
काय आहे घटना -
11 जानेवारीला लोकल रेल्वेने प्रवास करत असताना पूनम चव्हाण व अन्वर अली शेख या दोघांमध्ये पुन्हा एकदा भांडण सुरू झाले. रागाच्या भरात पूनम चव्हाण ही रेल्वे डब्याच्या दरवाजा जवळ जाऊन उभी राहिली. काही वेळात अन्वर अली शेख हा पूनम जवळ येऊन त्याने तीला मिठी मारली. मात्र, काही कळण्या अगोदरच अन्वरने पूनमला धक्का देऊन धावत्या लोकलच्या बाहेर फेकले. या दुर्घटनेत पूनम चव्हाणचा मृत्यू झाला. रेल्वेत या दोघांच्या भांडणाकडे लक्ष देणाऱ्या एका महिलेने तात्काळ याची माहिती मानखुर्द जीआरपी पोलिसांना दिली. काही वेळातच पोलिसांनी अन्वर शेख याला अटक केली.