मुंबई - भारतीय स्वातंत्र्यलढ्यात ९ ऑगस्ट १९४२ या दिवसाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दिवशी महात्मा गांधी आणि अखिल भारतीय काँग्रेस समितीने (एआयसीसी) मुंबई अधिवेशनात 'भारत छोडो आंदोलन' सुरू केले होते. ऑगस्टमध्ये हे आंदोलन सुरू झाल्याने त्याला 'ऑगस्ट चळवळ' किंवा 'ऑगस्ट क्रांती' असेही म्हटले जाते. भारतातील ब्रिटिश शासन संपवण्यासाठी ही चळवळ सुरू करण्यात आली होती.
९ ऑगस्ट १९४२ रोजी मुंबईच्या गवालीया टँक येथे अखिल भारतीय काँग्रेस समितीचे महाअधिवेशन भरले होते. या अधिवेशनात महात्मा गांधी यांनी ‘छोडो भारत’ आंदोलनाची हाक दिली. या आंदोलनातून ब्रिटिशांना भारत सोडून जाण्याचा इशारा देण्यात आला होता. या आंदोलनाची सुरुवात मुंबईतील ‘गोवालीया टँक’ म्हणजे आजच्या ‘ऑगस्ट क्रांती मैदाना’तून झाली. त्यानंतर या आंदोलनाचा भडका संपूर्ण देशभरात पसरला. या आंदोलनादरम्यान, महात्मा गांधींनी भारतीयांना 'करेंगे या मरेंगे' असा नारा दिला होता.
या चळवळीदरम्यान देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी हजारो हुतात्म्यांनी आपल्या प्राणाची पर्वा न करता आहुती दिली. अशा अमर हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहून आजचा दिवस साजरा केला जातो.
मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदान -
महात्मा गांधी आणि इतर नेते ८ आणि ९ ऑगस्ट १९४२ रोजी मुंबईत एकत्र येऊन राष्ट्राला स्वातंत्र्यासाठी लढा देण्याचे आवाहन केले होते. मध्य मुंबईत वसलेल्या या मैदानात गाय आणि इतर पशूंना धुण्यासाठी एक टँक होती. त्यामुळे त्याला गोवालिया टँक म्हणून ओळखले जात असत. 'गो' म्हणजे गाय आणि 'वाला' म्हणजे त्या जनावरांचा मालक.
मुंबईतील मणिभवनजवळ असलेल्या ऑगस्ट क्रांती मैदान म्हणजेच गोवालिया हे मैदान ५ विभागात विभागले गेले आहे. त्यातील सर्वात मोठा भाग हा खेळाच्या मैदानासाठी आहे. तसेच वृद्धांसाठी एक उद्यान आणि लहान मुलांसाठी क्रीडांगण आहे. तर मैदानातील एका भागात हुतात्म्यांचे स्मारक आहे. हे मैदान म्हणजे एका महान ऐतिहासिक घटनेचा आणि भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासाचा एक भाग आहे. परंतु, दुर्दैवाने या मैदानाचा अनेक पर्यटन पुस्तकात उल्लेख नाही.
ऑगस्ट क्रांती राजधानी एक्सप्रेस -
भारताच्या इतिहासातील हा महत्त्वाचा दिवस लक्षात ठेवण्यासाठी, ऑगस्ट क्रांती दिवसाच्या ५० व्या वर्धापन दिनी भारतीय रेल्वेने मुंबई ते नवी दिल्ली या मार्गावर एसी एक्सप्रेस ट्रेन सुरु केली. या ट्रेनला ऑगस्ट क्रांती राजधानी एक्स्प्रेस असे नाव देण्यात आले.