मुंबई - आरोग्य विभागातील आरोग्य सेवक, चालक आणि सुतार श्रेणीत गैरव्यवहार झाला आहे. सायबर सेलमार्फत याची चौकशी सुरू असल्याने निकाल राखून ठेवले आहेत. या तीन श्रेणी वगळता उर्वरित कोणत्याही श्रेणीत घोटाळे झाले नसल्याचे स्पष्टीकरण आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी विधानपरिषदेत केले. तसेच आरोग्य विभागाच्या परीक्षा रद्द होणार नसल्याचे संकेतही टोपे यांनी यावेळी दिले.
काळ्या यादीतील कंपनीला परीक्षेचे कंत्राट
आरोग्य विभागातील २८ फेब्रुवारी रोजी झालेल्या परीक्षेत आरोग्य घोटाळा झाला असून यात सुस्पष्टता नाही. परीक्षा घेण्यासाठी काळ्या यादीतील कंपनीला परीक्षेचे कंत्राट दिले. शिवाय प्रश्नपत्रिका फुटली. या प्रकरणी न्याय व्हावा, अशी मागणी विनायक मेटे यांनी अल्पकालीन चर्चेत केली होती. सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी यावर उत्तर दिले.
दोषींवर कारवाई
या परीक्षेसाठी 54 श्रेणीसाठी परीक्षा घेण्यात आली. 14 लाख 16 हजार अर्ज यावेळी प्राप्त झाले होते. या परीक्षेत 1 लाख 33 हजार बसले होते. ही परीक्षा 32 जिल्ह्यात 829 केंद्रात झाली. यापैकी औरंगाबाद जिल्ह्यात एका केंद्रत उशिरा पत्रिका गेल्या. त्याठिकाणी अधिक वेळ देण्यात आला. तर दोन ठिकाणी केंद्र उशिरा उघडण्यात आले. त्या ठिकाणीही वेळ वाढवून दिला होता. राहुरी आणि नाशिक येथील केंद्रांवर गर्दी होत असल्याने गैरहजर असलेल्या बेंचवर जागा दिल्या होत्या. यावेळी नगरमध्ये एका ठिकाणी डमी विद्यार्थी बसविण्यात आल्याचे निदर्शनास आले. त्या विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले असून त्या विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती टोपे यांनी दिली. तसेच कोणत्याही केंद्रावर उत्तर पत्रिका कोऱ्या दिल्या नव्हत्या. मात्र विरोधकांचा आक्षेप असल्यास चौकशी करू, असे टोपे यांनी स्पष्ट केले. तसेच औरंगाबाद चिखलीठाण्यात एका परीक्षार्थीकडे गॅजेट आढळल्याने त्यालाही अटक करण्यात आल्याचे टोपे यांनी सांगितले.
परीक्षा घेण्याचा निर्णय सभागृहाचा
एक आरोग्य सेवक आणि वाहन चालक यांच्यापर्यंत काही प्रश्न पोहचले. त्यामुळे हा तपास सायबर सेलकडे देण्यात आला आहे. असे असताना यावरून परीक्षा रद्द करून 1लाख 33 हजार विद्यार्थ्यांना वेठीस धरता येणार नाही. तरीही विरोधकांचा आक्षेप असेल तर परीक्षा पुन्हा घ्यावी का, याबाबत निर्णय सभागृहाने घ्यावा, असे टोपे म्हणाले.
विरोधकांचा सभात्याग
टोपे यांच्या उत्तराने विरोधी पक्षाच्या सदस्यांचे समाधान झाले नाही. त्यांनी घोटाळा झाला आहे, त्यामुळे परीक्षा रद्द करा, अशा घोषणा देत सभात्याग केला.