मुंबई - राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी विधानसभा अध्यक्ष निवडीबाबत राज्य सरकारला पत्र पाठवले. या पत्रावरून राज्याचे परिवहन मंत्री आणि शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त रिक्त जागांच्या मुद्द्यावरून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना लक्ष्य केले आहे. राज्यपालांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाबाबत जशी काळजी दाखवली, तशीच काळजी दाखवत विधान परिषदेच्या रिक्त १२ जागांवर निर्णय घ्यावा, असा पटलवार परब यांनी राज्यपालांवर केला.
हेही वाचा - महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्येचा आलेख चढता; विदर्भामध्ये स्थिती चिंताजनक
राज्यपालांकडून विधानसभा अध्यक्ष पदाबाबत आघाडी सरकारला पत्र पाठविण्यात आले. या पत्राबाबत परब यांना विचारणा केली असता, अध्यक्ष पदाबाबत निवडणूक कुठल्या दिवशी घ्यायची, हे कॅबिनेटच्या बैठकीत ठरेल. राज्यपालांनी जशी अर्थसंकल्पीय अधिवेशनाबाबत काळजी दाखवली, त्याचप्रमाणे काळजी दाखवत विधान परिषदेच्या १२ रिकाम्या जागांवर अधिवेशनाआधी निर्णय घ्यावा, असा टोला परब यांनी राज्यपालांना लगावला.
रिक्त पदांसंदर्भात कॅबिनेटमध्ये निर्णय घेतला जाईल आणि मग तो निर्णय राज्यपाल यांना कळवण्यात येईल, असे परब यांनी सांगितले. राज्यपालांनी घटनात्मक विचार आणि काळजी व्यक्त केली. तसेच, अधिवेशनातील विषय विरोधकांनाही सांगण्यात आले आहेत. सरकार कुठल्याही चर्चेला घाबरत नाही, असे परब म्हणाले.
हेही वाचा - इंधनावरील राज्याचा कर अधिक; सरकार दिलासा देण्याच्या तयारीत?