मुंबई - येथील महालक्ष्मी रेसकोर्स परिसरात एका भरधाव मर्सिडीज कारने रस्त्यावरील पादचाऱ्यास चिरडल्याची घटना रात्री घडली. यामध्ये पादचाऱयाचा मृत्यू झाला आहे. राजेंद्र कुमार लोचनराग (वय 43) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी ताडदेव शाखेच्या पोलिसांनी मुंबईतील प्रसिद्ध हिरे व्यापारी ललित अदानी यांचा मुलगा चैतन्य अदानी यास अटक केली आहे.
ही घटना सोमवारी रात्री 9 च्या दरम्यान घडली. चैतन्य अदानी हा त्याच्या मर्सेडिज (एमएच-02-सीबी - 0333) कारने हाजीआली सिग्नल येथून महालक्ष्मी जवळ येत होता. यावेळी भरधाव वेगात एका कारला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात त्याचा वाहनावरील ताबा सुटल्याने त्याची कार महालक्ष्मी रेसकोर्सची भिंत तोडून रस्त्यावरून जाणाऱ्या राजेंद्र कुमार लोचनराग याला चिरडत पुढे गेली. या प्रकरणी पोलिसांनी कलम - 304 (अ), 427 नुसार गुन्हा नोंदविला आहे.