मुंबई : (Mumbai) देशाच्या स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्धापनदिनानिमित्त स्वातंत्र्याचा 'अमृत महोत्सव' (Amrit Mahotsav) साजरा केला जात आहे. देशाच्या प्रत्येक नागरिकाने घरी तिरंगा लावावा यासाठी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'हर घर तिरंगा' (Har Ghar Tiranga) अभियानाची सुरुवात केली. या अभियानांतर्गत स्वातंत्रदिनाच्या पार्श्वभुमीवर देशभरातील २० कोटींहून अधिक घरांवर तिरंगा (tricolor flag) ध्वज फडकवला जाणार आहे. हे अभियान यशस्वी करण्यासाठी शासकीय कार्यालयापासून ते राजकीय कार्यकर्त्यांपर्यंत सगळे जोरात कामाला लागले आहे. त्यामुळे आता तिरंगा झेंडाची मागणी वाढली आहे. यावर मुंबईत नेमकी काय स्थिती आहे; याचा आढावा घेतलाय ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधींनी.
पूर्व कल्पना असती तर : देशाच्या स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्धापनदिनानिमित्त केंद्र सरकारने 'हर घर तिरंगा' अभियान सुरू केले आहे. त्यामुळे बाजारात तिरंगा झेंड्याची मागणी प्रचंड वाढली असल्याने, मुंबईतील तिरंगा झेंडे विक्री करणाऱ्या छोट्या व्यासायिकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. पक्षीय नेते, स्थानिक नगरसेवक आणि विविध कार्यालयामध्ये तिरंगा झेंड्याची मागणी प्रचंड आहे. या अभियानाची पूर्वकल्पना असती तर, आम्ही अधिक तयारी केली असती; अशी प्रतिक्रिया मुंबईच्या लालबाग येथील झेंडा विक्रेते योगेश पारेख यांनी ईटीव्हीशी बोलतांना दिली.
अचानक केलेल्या घोषणेमुळे वेळ कमी : "१५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला मोठ्या प्रमाणात तिरंगा झेंड्यांची विक्री होते. त्यासाठी आमची अगोदरपासून सुरत मधील असलेल्या कारखान्यांना डिपॉझिट देऊन ऑर्डर बुक केली जाते. दरवर्षी प्रमाणे यंदा ७५ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त थोडी जास्त तयारी केली होती. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'हर घर तिरंगा अभियानाची घोषणा केली. त्यामुळे आमच्याकडे प्रचंड तिरंगा झेंड्याची मागणी होत आहे. ही मागणी नागरिकांकडून नव्हे, तर मुंबईतील खाजगी कार्यालय, शासकीय कार्यालय आणि छोट्या-मोठ्या राजकीय पक्षातील नेते मंडळींकडुन मागणी होत आहे. त्यामुळे या अभियानाची आम्हाला पूर्वकल्पना असती;तर आम्ही आणखी तयारी केली असती, असे मत झेंडा विक्रेते पारेख यांनी व्यक्त केले.
मागील 16 वर्षांपासून राजकीय व तिरंगा ध्वजाची विक्री : मागील 16 वर्षांपासून राजकीय व तिरंगा ध्वजाची विक्री लालबाग मधील पारेख ब्रदर्स करतात. त्यांच्या दुकानात सर्वच राजकीय पक्षांचे झेंडे, शाल, पताका विक्रीसाठी उपलब्ध असतात. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक पारेख ब्रदर्स यांच्याकडून राजकीय झेंडे घेऊन जातात. या झेंड्यांसोबतच पारेख ब्रदर्स हे तिरंगा ध्वजाची देखील विक्री करतात. मात्र, ही मागणी काही ठराविक काळापूर्ती मर्यादित असते. तर, राजकीय झेंड्यांची मागणी ही नेहमी सुरूच असते, असs पारेख ब्रदर्स सांगतात.
मुंबईतून मागणी अधिक : योगेश पारेख सांगतात की, "सध्या मोठ्या प्रमाणात '१४ बाय २१' च्या कापडी तिरंगा झेंड्याची मागणी आहे. २ हजार ते २५ हजारपर्यंत प्रत्येक ग्राहक तिरंगा झेंड्याची मागणी करतो आहे. यामध्ये सर्वाधिक ग्राहक हे मुंबईतील नगरसेवक आहे. हर घर तिरंगा मोहिमेला यशस्वी करण्यासाठी ते नागरिकांना निःशुल्क तिरंगे वितरित करणार आहेत. त्यामुळे तिरंगा झेंड्याची मागणी वाढली आहे."
तिरंगा महागला : गेल्या वर्षी '१४ बाय २१' च्या स्टॅंडर्ड कापडी तिरंग्याची किंमत घाऊक बाजारात १६ रुपये प्रति तिरंगा होता. तेव्हा झेंडा विक्रेता २० रुपये प्रती झेंडा विक्री करत होते. मात्र, यंदा हाच झेंडा घाऊक बाजारात ६ रुपयाने महागला असून तो आता २२ रुपये प्रति तिरंगा या दराने मिळत आहे. त्यामुळे आम्ही २५ रुपये प्रति झेंडा विक्री करत आहे. अशी माहिती पारेख यांनी दिली.
नवीन ऑर्डर स्वीकारत नाहीत : आशिया खंडातील सर्वांत मोठा कापड बाजर म्हणून गुजरातच्या सुरत शहराची ओळख आहे. मुंबईतही छोटे व्यासायिक प्रचार सामुग्री आणि तिरंगा झेंडे सुरतमधून मागवतात. त्यासाठी तीन-चार महिन्यांपूर्वी सुरतमधील छपाई कारखान्यांना, ऑर्डर द्यावी लागते. मात्र, यंदा 'हर घर तिरंगा' अभियानामुळे सुरातच्या कापड बाजारात तिरंगा झेंडाची प्रचंड मागणी आहे. त्यामुळे सुरतमधील तिरंगा झेंडा बनवणाऱ्या कारखान्यावर मोठ्या प्रमाणात दबाव आला आहे. आम्ही नवीन ऑर्डर दिल्यास, आमच्या ऑर्डर स्विकारत नसल्याची प्रतिक्रिया पारेख यांनी दिली.
खादी पेक्षा इतर झेंड्यांना पसंती : यावेळी झेंड्यांची मागणी खूप जास्त आहे. मात्र अनेकजण खादीचा दर बघून ऑर्डर थांबवित आहे. यावेळी पहिल्यांदा खादीशिवाय कुठल्याही प्रकारच्या कापड्याच्या झेंड्याला केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. त्यामुळे बाजारात अगदी 30 रुपयालाही झेंडा मिळत आहे. खादीचा झेंडा त्यातुलनेने महाग असल्यामुळे लोक इतर झेंड्याचा पर्याय जास्त स्विकारत आहे.
हेही वाचा : Har Ghar Tiranga : सोलापुरात भारतीय तिरंग्यांसह देशविदेशातील झेंडेही बनतात; मोठ्या प्रमाणात मागणी