मुंबई - राज्यात कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा झपाट्याने वाढत आहे. अशातच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व नियमावली यापुढे अधिक कठोर करण्यात आल्या आहेत. यासंदर्भातील नवे परिपत्रक सरकारने जाहीर केले आहे. मात्र, त्यानंतरही मार्केट आणि खरेदीसाठी नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करत असल्याने या गर्दीवर नियंत्रण आणण्याचे आव्हान राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेसमोर आहे.
कोरोना रुग्ण वाढले -
राज्यात मागील वर्षी मार्चमध्ये कोरोनाचा प्रसार सुरू झाला. कोरोनाचा प्रसार सुरू झाल्यावर लॉकडाऊन लावण्यात आला. जूनपासून त्यात मिशन बिगीन अंतर्गत टप्प्याटप्याने शिथिलता देण्यास सुरुवात करण्यात आली. सध्या सर्वच क्षेत्र खुली केल्याने नागरिकांची गर्दी वाढू लागली आहे. 1 फेब्रुवारीपासून लोकल ट्रेनमध्ये सर्वसामान्य प्रवाशांना प्रवासाची मुभा दिल्याने ट्रेनमध्ये गर्दी वाढली आहे. हॉटेल, पब, बार, नाईट क्लब, लग्न समारंभ, मार्केट आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ लागली आहे. त्यामुळे पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. राज्यात गेल्या काही दिवसात 15 हजारावर रुग्ण आढळून येत आहेत. तर मुंबईत 1500 ते 2000 हजार रुग्ण आढळून येत आहेत. राज्यात अनेक ठिकाणी कडक नियमांची अंमलबजावणी केली जात आहे.
हेही वाचा- भारतीय हवाई दलाच्या मिग -21 विमानाचा अपघात; वैमानिकाचा मृत्यू
नियम कडक -
राज्यात रुग्णसंख्या वाढल्याने पुन्हा लॉकडाऊन करण्याची गरज निर्माण झाली असताना सरकारने कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी नव्या मार्गदर्शक लागू केल्या आहेत. यात राज्यातील सर्व रेस्टॉरंट, सिनेमागृहे (सिंगल स्क्रिन आणि मल्टिप्लेक्स) 50 टक्के क्षमतेने सुरू राहणार आहे. त्यात मास्क शिवाय कोणालाही आत येण्याची परवानगी दिली जाणार नाही. ठिकठिकाणी सॅनिटायजर लावणेही बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच नियमांचे उल्लंघन केल्यास कोरोना जाईपर्यंत ते रेस्टॉरंट किंवा चित्रपटगृहे बंद करण्याचा निर्णय घेण्यात येईल असा इशारा सरकारने दिला आहे. हे नियम शॉपिंग मॉल्सनाही अनिवार्य राहतील, असे परिपत्रकात म्हटले आहे. राज्यातील सर्व सामाजिक, धार्मिक, राजकीय व सांस्कृतिक कार्यक्रमांवरदेखील बंदी घालण्यात आल्याचे यात नमूद आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई करण्याचे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत. लग्न समारंभासाठी 50 लोकांना परवानगी असेल तर अत्यंसंस्कारात 20 पेक्षा जास्त जणांना परवानगी दिली जाणार नाही, असे परिपत्रकात नमूद केले आहे.
गर्दीवर नियंत्रण गरजेचे -
राज्य सरकारने नियम कडक करून त्याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश स्थानिक पातळीवरील प्रशासनाला दिले आहेत. मुंबईतही रुग्ण संख्या वाढत आहे. पालिका क्षमतेपेक्षा जास्त लोक असतील अशा लग्न समारंभ, कार्यक्रम आदी ठिकाणी लक्ष ठेवून आहे. मात्र मार्केटमध्ये खरेदीसाठी होणारी गर्दी, मॉलमधील गर्दी इतर ठिकाणी होणारी गर्दी यावर नियंत्रण आणण्याची गरज आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी गर्दीवर नियंत्रण आणण्याचे मोठे आव्हान राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेसमोर आहे.
हेही वाचा- अँटिलिया प्रकरण : पीपीई किटमधील व्यक्ती सचिन वाझेच?