मुंबई - देशातील शालेय विद्यार्थ्यांच्या पाठीवर दप्तराचे ओझे किती असावे यासाठी केंद्रीय शिक्षण विभागाने अखेर आपले ‘स्कूल बॅग धोरण २०२०’ धोरण जाहीर केले आहे. या धोरणानुसार प्रत्येक विद्यार्थ्याच्या वजनाच्या केवळ दहा टक्के इतकेच दप्तराचे वजन असावे आणि त्याप्रमाणे प्रत्येक शिक्षण मंडळांनी, शाळांनी यासाठीच काटेकोरपणे कार्यवाही व्हावी असे निर्देश दिले आहेत. तर या धोरणात पहिल्यांदाच पूर्व प्राथमिकसाठी असलेल्या मुलांना मोठा दिलासा देण्यात आला असून या वर्गांना दप्तरच नसणार आहे.
केंद्रीय शिक्षण विभागाने जाहीर केलेल्या या धोरणात देशातील प्रत्येक राज्यातील शिक्षण मंडळाच्या इयत्ता पहिली आणि दुसरीसाठी एक वही आणि तिसरी ते पाचवीसाठी एक वर्गातील आणि एक गृहपाठ अशा दोन वह्या तर सहावी ते आठवीकरीता फाइल सूटे कागद नोट्स काढण्यासाठी वापरण्या याव्यात असे या सांगण्यात आले आहे. तसेच दप्तराचे ओझे किती असावे यासोबतच देशातील सर्वच शाळांचे वेळापत्रक कसे असावे, याबाबतही यामध्ये सूचना करण्यात आल्या आहेत.
शिक्षण मंडळाची पुस्तके, खासगी वितरकांसोबत शाळा व्यवस्थापनांकडून देण्यात आलेल्या पुस्तके, वह्या आदींमुळे विद्यार्थ्यांच्या पाठीवर जास्तीचे दप्तराचे ओझे झाले होते. यामुळे अनेक मुलांना पाठदुखीचा आजार जडला होता. याविषयी अनेक तज्ज्ञांनी आपले अहवालही सादर केले केले होते. यामुळे राज्यातही दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी निर्णय घेण्यात आला होता. पण, त्याची नीट अंमलबजावणी होऊ शकली नव्हती. अशीच गत देशातील इतर राज्यांमध्ये सुरू होती. यामुळे याविरोधात देशभरातील पालकांनी तक्रारी केल्या होत्या. हे प्रकरण उच्च न्यायालयातही गेले होते. यामुळे दप्तरांच्या ओझ्याचा प्रश्न निकाली लावण्यासाठी केंद्र सरकारने दोन वर्षांपूर्वीच दप्तराचे आझे किती असावे याबाबत स्पष्टीकरण देण्यासाठी एक समिती नियुक्त केली होती. या समितीमध्ये राज्याच्या प्राथमिक शिक्षण विभागाचे सहसंचालक दिनकर टेमकर हेही सहभागी होते. समितीने दिलेल्या अहवालाला केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. आता याची अंमलबजावणी देशातील सर्व राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांमध्ये करावी, अशा सुचना केंद्र सरकारचे सचिव सुनीता शर्मा यांनी दिल्या आहेत.
दप्तर तपासण्याची शिक्षकांवर जबाबदारी
प्रत्येक शाळांतील शिक्षकांना नियमितपणे विद्यार्थ्यांचे दप्तर तपासावे लागेल. दप्तराचे आझे वाटणार नाही याप्रमाणे वेळापत्रक आखणे आवश्यक असणार आहे. प्रत्येक वर्गात पाठ्यपुस्तके शेअर करण्याची सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक असून पाण्याची बाटली टाळण्यासाठी शाळांमध्येच पिण्याच्या पाण्याची सोय करावी लागणार आहे. तसेच शिक्षण मंडळांनी प्रत्येक पाठ्यपुस्तकांची निर्मिती करतानाही वजन वाढणार नाही, याची दक्षता घ्यावी लागणार आहे.
शाळांच्या प्रमुखांनी वजदार दप्तराबाबत मान्य केले होते मान्य
दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी मसुदा तयार करण्यासाठी केलेल्या सर्वेक्षणात ३५२ शाळा, २ हजार ९९२ पालक आणि ३ हजार ६२४ विद्यार्थी सहभागी झाले होते. यामध्ये १९ टक्के प्राथमिक शाळांच्या प्रमुखांनी विद्यार्थ्यांच्या दप्तराचे वजन अधिक असल्याचे मान्य केले. तर रोज न्यावी लागणारी सर्व पाठ्यपुस्तके, वह्या, संदर्भ पुस्तके, क्रीडा आणि अन्य साहित्य, जेवणाचा डबा यामुळे वजन वाढले होते. याच्या असंख्य तक्रारी पालकांनी केल्या होत्या.
यापुढे असे असेल इयत्तानिहाय दप्तराचे वजन
इयत्ता | विद्यार्थ्याचे वजन | दप्तराचे वजन |
पूर्व प्राथमिक | १० ते १६ किलो | दप्तराविना |
पहिली, दुसरी | १६ ते २२ किलो | १.६ ते २.२ किलो |
तिसरी ते पाचवी | १५ ते २५ किलो | १.५ ते २.५ किलो |
सहावी, सातवी | २० ते ३० किलो | २ ते ३ किलो |
आठवी | २५ ते ४० किलो | २.५ ते ४ किलो |
नववी, दहावी | २५ ते ४५ किलो | २.५ ते ४.५ किलो |
अकरावी, बारावी | ३५ ते ५० किलो | ३.५ ते ५ किलो |
हेही वाचा - पाणी जपून वापरा...! दादर, प्रभादेवी, माहीममध्ये २ आणि ३ डिसेंबरला पाणीपुरवठा बंद