नवी मुंबई : फोटोग्राफिक सोसायटी ऑफ इंडिया आणि भारतीय विद्या भवन नवी मुंबई यांच्या माध्यमातून 21व्या पीएसाय आंतरराष्ट्रीय छायाचित्र प्रदर्शन 2023 चे आयोजन नवी मुंबईत करण्यात आले होते. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. मला कलेचा वारसा हा माझ्या वडिलांकडून मिळाला आहे. कला रक्तात असावी लागते. कलाकृती अनेकांनी विकत घेतल्या आहेत, असेही उद्गार उद्धव ठाकरे यांनी यावेळी काढले.
बऱ्याच दिवसानंतर माहेरची माणसे भेटली : यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, कलेचा वारसा मला वडिलांकडून मिळाला आहे. यापूर्वी माझी एक मुलाखत होती आणि मुलाखत घेणाऱ्याने विचारले की, तुमचे वडील शिवसेनाप्रमुख आहेत, उत्तम राजकीय नेते आहेत आणि उत्तम व्यंगचित्रकारही आहेत. जर तुम्हाला त्यांच्याकडून एकच वारसा घ्यायचा असेल तर तुम्ही कोणता वारसा घ्याल? क्षणाचाही विलंब न लावता मी कलेचा वारसा मला मिळेल, असे मी म्हटले होते. उद्धव ठाकरे हे व्यवसायाने फोटोग्राफर म्हणून नावाजलेले आहेत. त्यांच्या कित्येक फोटोग्राफीचे प्रदर्शन देखील झाले आहे. आंतरराष्ट्रीय फोटोग्राफी प्रदर्शनाला बोलवल्यावर बऱ्याच दिवसानंतर माहेरची माणसे भेटली, असेही उध्दव ठाकरे यांनी म्हटले आहे.
कलेचा वारसा वडिलांकडून लाभला : राजकारण किंवा कला यातून कोणता वारसा वडिलांकडून घ्यायचा तर मी कलेचा वारसा निवडला असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले. आपण कलाकृती विकत घेऊ शकतो पण कला विकत घेऊ शकत नाही असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले. त्यामुळे आमच्या काही कलाकृती काही लोकांनी विकत घेतल्या आहेत हे खरे, पण जोपर्यंत कलाकार जागा आहे, तोपर्यंत अशा अनेक कलाकृती घेऊन जाण्याचा प्रश्नच येत नाही.
चित्रांचे प्रदर्शनाचे होते स्वप्न : महाविद्यालयीन काळात मी जहांगीर आर्ट गॅलरी जवळून जात असे. जहांगीर आर्ट गॅलरी येथे भरणारे प्रदर्शन मला नेहमी आकृष्ट करत होते. तेव्हा मलाही वाटायचे माझ्या छायाचित्रांचीही प्रदर्शन येथे भरवले पाहिजे. खर तर ते माझे स्वप्न होत. त्यानंतर मी काढलेल्या फोटोंची तीन प्रदर्शने या गॅलरीत भरवली गेली, असे वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केले आहे.
हेही वाचा - Uddhav Thackeray : एक-एक फोडण्यापेक्षा...; उद्धव ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान
Nana Patole on Opposition Leader : पुढच्या आठवड्यात ठरणार काँग्रेसचा विरोधी पक्षनेता - नाना पटोले
Sharad Pawar Retirement : शरद पवार 'या' महिन्यात राजकारणातून होणार निवृत्त? पण...