मुंबई: शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यातील संघर्षावर केंद्रीय निवडणूक आयोगाने निकाल देत शिवसेना शिंदे गटाला शिवसेनेचे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह देण्याचा निर्णय घेतला मात्र या निर्णयाचे दूरगामी परिणाम आता दिसू लागले आहेत. शिवसेना ठाकरे गटाने गेल्या पन्नास वर्षाहून अधिक काळात कमावलेलं नाव आणि पक्ष संघटना एका निर्णयाने गमावली आहे.
उद्धव ठाकरे यांनी काय काय गमावले : शिवसेना पक्ष पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह गमावल्यानंतर उद्धव ठाकरे यांना जनतेतून सहानुभूती मिळत आहे. मात्र, प्रत्यक्षात कायद्याने धनुष्यबाण आणि शिवसेना हे नाव शिंदे गटाला दिल्यानंतर पक्षावर शिंदे गटाची अधिकृत मालकी निर्माण झाली आहे त्यामुळे सर्वात आधी पक्ष आणि चिन्ह ठाकरे गटाने गमावले आहे.
समाज माध्यमांवरूनही पीछेहाट : दरम्यान शिवसेना पक्षाचे पेज असलेल्या अकाउंट वर आता बदल दिसू लागले आहेत. शिवसेना हे पेज शिंदे गटाकडे गेले आहे त्यामुळे त्याचा अधिकृत ताबा हा शिंदे गटाने घेतल्याचे दिसते आहे. त्यामुळे समाज माध्यमांवरही इंस्टाग्राम फेसबुक अशा खात्यांवर शिंदे गटाने मालकी सांगितली आहे.
विधान भवन कार्यालयावर दावा: शिवसेना विधिमंडळ पक्षाचा ताबा शिंदे गटाने काही दिवसापूर्वी घेण्याचा प्रयत्न केला होता मात्र त्यावेळी ठाकरे गटाने जोरदार विरोध करून हे कार्यालय आपल्या ताब्यात ठेवले होते. आता केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर शिवसेना हे नाव शिंदे गटाला मिळाल्यामुळे शिंदे गटाने आज विधानभवनातील शिवसेना विधिमंडळ पक्षाच्या कार्यालयाचा ताबा घेतला.
महापालिकेतील कार्यालयावर हक्क : त्या पाठोपाठ आता मुंबई महानगर पालिकेतील कार्यालयावरून झालेल्या राड्या मध्ये हे कार्यालय दोन्ही गटांना न देता बंद ठेवण्यात आले होते. मात्र, आता निवडणूक आयोगाचा निर्णय आल्यामुळे या कार्यालयावर शिवसेना शिंदे गटाचा अधिकृत हक्क असल्याचे सांगत हे कार्यालयाची ताब्यात घेण्याचा प्रयत्न शिंदे गटाने सुरू केला आहे.
शिवसेना शाखांवरही दावा : दरम्यान राज्यातील शिवसेनेच्या पक्षाच्या नावावर नोंद असलेल्या अधिकृत शाखांवर आता शिवसेना म्हणून शिंदे गट ताबा घेणार आहे याबाबत लवकरच मुख्यमंत्री आणि अन्य सहकाऱ्यांशी चर्चा करून त्याबाबतची रणनीती आखली जाईल, अशी माहिती शिवसेना शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी दिली आहे. तसेच पक्षनिधी हा पक्षाचा निधी मानला जातो त्यामुळे पक्ष निधी बाबतही आम्ही लवकरच निर्णय घेणार आहोत असेही गोगावले यांनी सांगितले.
शिवसेना भवन, सामना ठाकरे गटाकडेच : दरम्यान मुंबईतील शिवाजी पार्क दादर येथे असलेले शिवसेनेचे मुख्यालय शिवसेना भवन हे कुणाच्या ताब्यात जाणार याबाबत आता तर्कवितर्क लढवले जात आहेत. मात्र, या कार्यालयाची नोंद पक्षाच्या नावावर नाही तर शिवाई ट्रस्टच्या नावावर आहे. त्यामुळे हे कार्यालय शिवाई ट्रस्टचे अध्यक्ष लीलाधर डाके यांच्या अखत्यारीत आहे त्यामुळे सध्या जरी शिवसेना पक्ष शिंदे यांच्याकडे गेला असला तरी हे कार्यालय म्हणजेच शिवसेना भवन शिंदे गटाकडे जाण्याची शक्यता दिसत नाही त्याचप्रमाणे सामना हे शिवसेनेचे मुखपत्र मांनले जाते. या मुखपत्राची मालकी प्रबोधन प्रकाशन या संस्थेकडे आहे त्यामुळे प्रबोधन प्रकाशन ही संस्था रश्मी ठाकरे यांच्या अधिपत्याखाली असल्याने सामना मुखपत्र ही शिंदे गटाकडे जाण्याची शक्यता नाही.