मुंबई- राज्यात कोरोना संक्रमण वाढत असून यावर उपाययोजना करण्यात येत आहेत. लॉकडाऊनचे काटेकोरपणे पालन करता यावे यासाठी राज्यात रस्त्यावर पोलीस 24 तास उभे असून याचा फटका पोलीस खात्याला बसला आहे. यामुळे पोलिसांवरील ताण कमी करण्यासाठी केंद्राकडे 20 सशस्त्र पोलीस तुकड्या पाठवण्याची मागणी केली होती. 10 सशस्त्र पोलिसांच्या तुकड्या राज्यात दाखल झाल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जाहीर केले आहे.
राज्यात 1273 पोलीस कोरोना संक्रमित असताना 11 पोलिसांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांवरचा ताण लक्षात घेता राज्य शासनाने केंद्राकडे 20 सशस्त्र पोलीस तुकड्या पाठवण्याची मागणी केली होती.
10 सशस्त्र पोलीस तुकड्यात 5 रॅपिड एक्शन फोर्स , 3 सीआयएसएफ, 2 सीआरपीएफचा समावेश आहे. राज्यातील पोलिसांना विश्रांती मिळावी म्हणून या तुकड्या राज्यातील मुंबई , पुणे , औरंगाबाद, मालेगाव व अमरावती या सारख्या ठिकाणी तैनात करण्यात येणार आहेत.
आगामी काळातील ईद ,वारी आणि गणपती उत्सवांच्या पार्श्वभूमीवर सशस्त्र पोलिसांचा बंदोबस्त हा महत्वाचा मानला जात आहे.