मुंबई: अपघात होताच स्थानिक नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी शवविच्छेदनासाठी त्याचा मृतदेह रुग्णालयात हलवण्याची व्यवस्था केली. कॅथे पॅसिफिक एअरलाईन्सचे कर्मचारी मर्सिडिज बेन्सच्या बसमधून हॉटेल ताज लॅण्ड्स एंडमध्ये जात होते. बस वाकोला ब्रिजवर पोहोचताच टेम्पो आणि बसमध्ये जोरधार धडक झाली. या अपघातात टेम्पो चालकाने जागीच मृत्यू झाला. तर बसचा चालकाने घटनास्थळावरुन पळ काढला. या अपघातात बसमध्ये असलेल्या एका महिलेच्या नाकाला दुखापत झाल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे. तसेच बसमधील सर्व कर्मचारी परदेशी नागरिक आहेत. सर्व जण सुरक्षित आहे. अपघात नेमका कोणाच्या चुकीमुळे झाला हे अद्याप समजू शकले नाही.
देशभरात सातत्याने अपघात: सरकारे रस्ते सुरक्षेसाठी उपाययोजना करत असूनही, देशभरात सातत्याने अपघात घडत आहेत. कालच, जम्मू आणि काश्मीरच्या राजौरी भागातील केवल वळणावर बस पलटी झाल्याने दोन जणांचा मृत्यू झाला आणि 12 जण जखमी झाले. अपघाताच्या वेळी मिनी बसमध्ये 14 हून अधिक प्रवासी प्रवास करत होते. अपघाताची धडक एवढी होती की त्यातून कोणीही वाचू शकले नाही.तर बुधवारी ठाणे जिल्ह्यात दोन अपघात झाले. ज्यात दोन जणांचा मृत्यू झाला. तर अन्य एक जण जखमी झाल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. ठाणे शहरातील गोधबंदर रोडवर घडलेल्या यातील एका घटनेत कार चालकाचे वाहनावरील ताबा सुटून रस्त्याच्या कडेला असलेल्या खांबाला धडकली. या अपघातात एकाचा मृत्यू झाला.
ट्रकखाली चिरडून मृत्यू : अशीच एक घटना काल ठाणे येथे घडली होती. मुंबई-नाशिक द्रुतगती महामार्गावरून दोघे मित्र दुचाकीवरून भिवंडीहून मुंबईच्या दिशेने जात असताना पाठीमागून भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली होती.या झालेल्या अपघातात दोघांचा ट्रकखाली चिरडून मृत्यू झाला होता. ही घटना महामार्गावरील खारेगाव ब्रिजलगतच्या बॉम्बे ढाब्यासमोर घडली होती. या प्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात भीषण अपघाताच्या घटनेची नोंद करून पोलिसांनी तपास सुरू केला. सूरज सुनिल कुंचिकोरवे (२६), मुत्तू लक्ष्मण मुरघन तेवर (२६ दोघे रा.धारावी, मुंबई) अशी अपघातात दुर्दैवी मृत्यू झालेल्या मित्रांची नावे आहेत.
ट्रक चालक ट्रकसह घटनस्थळावरून फरार : मृतक सूरज, मुत्तू दोघेही जिवलग मित्र असून मुंबईतील धरावी भागात रहात होते. त्यातच २८ फेब्रुवारी रोजी (मंगळवारी) रात्रीच्या सुमारास मृतक सूरज हा त्याची (बुलेट) रॉयल इंटफिल्ड दुचाकी घेऊन त्याचा मित्र मुत्तू याच्यासोबत मुंबईहून फिरण्यासाठी भिवंडी परिसरात कामा निमित्ताने आले होते. ते दोघे मुंबईतील धारावी येथील घरी परत जाण्यासाठी रात्रीच्या सुमारास निघाले होते. दरम्यान भिवंडीहुन मुंबईच्या दिशेने बुलेट वरून जात असतानाच, त्यांची बुलेट खारेगाव ब्रिजलगतच्या बॉम्बे ढाब्यासमोर येताच भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने बुलेटला जोरदार धडक दिली. त्यांच्या डोक्यावरून चाके गेल्याने दोघांच्याही डोक्याचा चुराडा झाला होता. ट्रक चालक ट्रकसह घटनास्थळावरून फरार झाला होता.