मुंबई - पश्चिम रेल्वे मार्गांवर कांदिवली ते मालाड रेल्वे स्थानकांदरम्यान सकाळी १० वाजता लोकल ट्रेनच्या पेंटाग्राफमध्ये तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे अप जलद मार्गावरील लोकल वाहतूक विस्कळीत झाली. त्यामुळे प्रवाशांना रेल्वे रुळावरून चालत जावे लागले. या बिघाडामुळे प्रवाशांचे हाल झाले होते.
बुधवारी सकाळी १० वाजता कांदिवली आणि मालाड रेल्वे स्थानकादरम्यान लोकल ट्रेनच्या पेटांग्राफमध्ये झालेल्या बिघाडामुळे पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकलचे तीनतेरा वाजले. यामुळे अप आणि डाऊन जलद मार्गावरील लोकल गाड्या जागीच खोळंबल्या होत्या. परिणामी, लोकलच्या रांगा लागल्या. लोकलच्या खोळंब्यामुळे काही प्रवाशांनी लोकलमधून उतरून रेल्वे रुळाचा रस्ता धरला. या घटनेची माहिती मिळताच पश्चिम रेल्वेच्या अभियांत्रिकी पथकाने घटनास्थळी धाव घेतली आणि लोकलच्या पेंटाग्राफमधील तांत्रिक बिघाड दुरुस्त केला. मात्र, या घटनेमुळे लोकलचे बंचिग काढण्यासाठी काही लोकल फेर्या रद्द करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. परिणामी, सकाळच्या वेळेत प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.