मुंबई - दहावीचे अंतर्गत मूल्यमापन करण्यासंदर्भात राज्य मंडळाने कार्यपद्धती जाहीर केली, त्यानुसार विषयनिहाय गुणतक्ते सादर करण्यासाठी शिक्षकांना शाळांमध्ये बोलवण्यात येत आहे. मात्र, शिक्षकांना लोकल प्रवासात मुभा नसल्याने अनेक शिक्षकांना शाळेत पोहचण्यासाठी अडचणी येत आहेत. याबाबत अनेकदा निवेदन देऊन सुद्धा शासनाने लोकल सेवेत शिक्षकांना प्रवासात मुभा दिलेली नाही. त्यामुळे राज्य शासनाच्याविरोधात आता शिक्षकानी आक्रमक भूमिका घेतली आहे. उद्यापासून शिक्षक रेल्वे स्थानकांवर सेल्फी आंदोलन करणार आहेत.
शिक्षक आक्रमक
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या. अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे गुण देण्याचे राज्य मंडळाने ठरविले. त्याबाबतचे शासन निर्णय व शिक्षण मंडळाचे आदेश शाळांना प्राप्त झाले. राज्य मंडळाने जाहीर केलेल्या कार्यपद्धतीनुसार दहावीचे मूल्यमापन कसे करावे याबाबत राज्यातील शिक्षकांना शिक्षण मंडळाने प्रशिक्षण दिले. त्यानुसार मूल्यमापन न झालेल्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करणे, विषयनिहाय गुणतक्ते वर्ग शिक्षकांकडे सादर करणे, विद्यार्थ्यांचे निकाल संकलित करून शिक्षकांनी अंतिम निकाल शाळेच्या निकाल समितीकडे सादर करण्यासाठी ११ ते २० जूनपर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे हे मूल्यमापन करण्यासाठी शाळेत जाणे आवश्यक आहे. मात्र शिक्षकांना लोकल प्रवासात मुभा नसल्यामुळे शिक्षकांना मोठ्या प्रमाणात अडचणीचा सामना करावा लागत आहे.अनेक शिक्षक संघटनांनी लोकल प्रवासात शिक्षकांना परवानगी द्यावी याबाबत अनेकदा निवेदन मुख्यमंत्री आणि रेल्वेला दिली आहे. तरी सुद्धा आतापर्यत लोकल प्रवासात शिक्षकांना प्रवासासाठी परवानगी दिली नाही. त्यामुळे राज्य शासनाच्याविरोधात आता शिक्षकानी आक्रमक भूमिका घेतली आहे.
असे करणार आंदोलन -
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद मुंबईचे कार्यवाहक शिवनाथ दराडे यांनी सांगितले की, शासनाच्या आदेशानुसार दहावीच्या निकालाचे काम पूर्ण करणे आवश्यक आहे. याकरिता शाळेत जाण्यासाठी आपल्याला उपनगरीय रेल्वेतून प्रवासाची परवानगी मागत आहोत. परवानगी मिळवण्यासाठी मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री, मध्य व पश्चिम रेल्वे व्यवस्थापक, मुंबई मनपा आयुक्त, मुंबई महापौर यांच्यासोबतच मनपा विरोधी नेते, मुख्य सचिव, एसएससी बोर्ड अध्यक्ष यांना पत्र देऊन विनंती केलेली आहे. सर्वच स्तरावर सतत प्रयत्न करत आहोत. मात्र अद्यापही रेल्वे प्रवासाची परवानगी मिळालेली नाही. त्यामुळे उद्यापासून सर्व शिक्षक आपल्या घराजवळच्या रेल्वे स्टेशनवर जाऊन सेल्फी आंदोलन करणार आहेत.
दहावीच्या निकालावर परिणाम पडणार-
मुंबईतील ७० टक्के मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी हे पालघर, वसई, विरार, अंबरनाथ, कल्याण, कर्जत, कसारा, नवी मुंबई आणि पनवेल अशा दूरच्या ठिकाणी राहतात. यामध्ये महिलांचे प्रमाण जास्त आहे. त्यांना खाजगी वाहनातून प्रवास करणे अडचणीचे होते. त्यामुळे सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना उपनगरीय रेल्वे प्रवासाची परवानगी देणे आवश्यक आहे. याबाबद आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र दिले आहे. मात्र शिक्षकांना लोकल प्रवासाबाबत कोणाताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे दहावीच्या निकालावर पडण्याची शक्यता शिक्षकाकडून वर्तवण्यात येत आहे.