मुंबई - समायोजन आणि थकीत वेतनाच्या मागणीसाठी अपंग समावेशित शिक्षण योजनेतील शिक्षकांनी मुंबईतील आझाद मैदानावर बेमुदत धरणे आंदोलन केले होते. त्यांना शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी येत्या 11 तारखेला शिक्षक शिष्टमंडळ व अधिकारी मिळून निर्णय पारित करू असे आश्वासन दिले आहे. आश्वासनानंतर शिक्षकांनी आंदोलन मागे घेतले आहे. परंतु, 11 तारखेला जर योग्य निर्णय झाला नाही. तर, शिक्षक मुंबईत रेल्वे रोको, आत्मदहन, तसेच रस्ते जाम करतील, असा इशारा अपंग शिक्षक संघटनेने दिला आहे.
2018 च्या हिवाळी अधिवेशनात तावडे यांनी विशेष शिक्षकांचे समायोजन करण्याचे आश्वासन दिले होते. फेब्रुवारी 2018 पर्यंत हे समायोजन करण्यात येईल, असेही त्यांनी त्यावेळी जाहीर केले होते. मात्र, प्रत्यक्षात आजवर राज्य शासनाने कोणताही निर्णय घेतलेला नाही. वेळोवेळी आंदोलने करून सरकार फक्त आश्वासन देत आहे, असा आरोप या शिक्षकांनी केला आहे. त्यामुळे हे शिक्षक गेल्या 10 दिवसांपासून आझाद मैदान येथे आंदोलनाला करत होते.