मुंबई - शिक्षक समन्वय संघ, महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने मुंबईच्या आझाद मैदानावर गेल्या 19 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. राज्यातील विनाअनुदानित आणि अनुदान घोषित झालेल्या प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा, कॉलेजचे शिक्षक आंदोलन करत आहे. शासनाने सप्टेंबर 2019ला शाळांना 20 टक्के अनुदान घोषित केले होते. 20 टक्के अनुदान असलेल्या शाळांना टप्पा वाढ दिली जाणार होती. याबाबतचा निर्णय सेना भाजप सरकारने घेतला होता. नंतर निवडणुका झाल्या आणि महाविकास आघाडी सरकारने फेब्रुवारी 2020ला पुरवणी मागणी मंजूर केली होती. मात्र, त्यानंतर कोरोनामुळे या शिक्षकांना देण्यासाठी निधी वितरित करण्यात आला नाही. म्हणून हे आंदोलन सुरू आहे.
राज्य सरकारने संपूर्ण कालावधीत या शिक्षकांना काहीच पगार दिला नाही, असा आरोप आहे. दरम्यानच्या, काळात 27 शिक्षक मृत्यू पावले. काहींनी आत्महत्या केली. तर काही उदरनिर्वाह करू न शकल्यामुळे हृदयविकाराचा झटका आल्याने मरण पावले. आता पुन्हा ऑक्टोबर 2020 ला शासनाने निर्णय घेऊन या सर्व शिक्षकांना नोव्हेंबर 2020 पासून अनुदान देण्याचे मान्य केले. या घटनेलाही आता तीन महिने उलटून गेले आहेत. मात्र, शिक्षकांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळाले नाही.
हेही वाचा - ठाणे : कंटेनरची 5 वाहनांना धडक, पशुवैद्यकीय अधिकाऱ्यासह तिघे कुटुंबीय मृत्युमुखी
आजवर मोलमजुरी करून भाजी विकून उदरनिर्वाह करणाऱ्या या शिक्षकांचा संयमाचा बांध आता तुटत चाललेला आहे. म्हणूनच या शिक्षकांनी सरकारला इशारा दिलेला आहे. त्यांच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय ते मुंबईचा आझाद मैदान सोडणार नाही, असा इशारा यावेळी देण्यात आला आहे.
गुरुवारी मंत्रालयासमोर आपण आत्मदहन करणार असल्याचे या शिक्षकांचे म्हणणे आहे. शासनाने आता ही आमची मागणी मान्य करावी, अन्यथा घडणाऱ्या अनुचित प्रकाराबद्दल शासन पूर्णपणे जबाबदार असेल, असा इशारा आंदोलनकर्त्या शिक्षकांनी दिला आहे. सोमवारी या शिक्षकांनी पायी यात्रा काढत सरकारचे लक्ष वेधले. आज (मंगळवारी) सकाळी पुन्हा मंत्रालयाच्या बाजूला असलेल्या महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. तसेच आमच्या मागण्या पूर्ण होवो यासाठी राज्य सरकारला सद्बुद्धी देवो, अशी विनवणी त्यांनी महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला केली, अशी माहिती आंदोलक शिक्षकांनी दिली.