मुंबई - राज्याचा आरोग्य विभाग आणि मुंबई महानगरपालिकेने कोविड-19ची लस पहिल्यांदा कोणाला टोचायची, याबद्दलचे प्राधान्यक्रम ठरवले आहेत. त्यात कुठेही लहान मुलांचा उल्लेख नाही. लस आल्यानंतर शाळा, कॉलेज लवकरात लवकर सुरू करायचे असतील, तर सर्वप्रथम फ्रंटलाइन कोविड वॉरियर्स सोबतच शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना, शिक्षकांना आणि लहान मुलांना लस दिली गेली पाहिजे, अशी मागणी शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून केली आहे.
विद्यार्थ्यांना, शिक्षकांना आणि लहान मुलांना प्रथम लस दिली पाहिजे, अशी पालकांचीही मागणी आहे. शाळा, महाविद्यालये सुरू करण्यासाठी ही पूर्व अट असायला हवी. प्राधान्यक्रमात तातडीने यांचा समावेश करावा, अशी विनंती पाटील यांनी केली आहे.
कोविडची लस उपलब्ध नसताना, ट्रेनमध्ये प्रवेश नसताना, कोविड आणि ऑनलाइन शिक्षणाची डबल ड्युटी शिक्षक करत आहेत. आता त्यांना शाळेत 50 टक्के उपस्थित असणे बंधनकारक करण्यात आले आहे. ही बाब आजाराला आमंत्रण देणारी व शिक्षक आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या आरोग्याला धोका निर्माण करणारी आहे. त्यामुळे शिक्षकांना आताच प्रत्यक्ष ड्यूटीवर बोलवू नये. ऑनलाइन शिक्षण व विद्यार्थी-पालक संपर्क ही दोनच कामे त्यांना देण्यात यावीत. कोणतीही अशैक्षणिक कामे देऊ नयेत. यासाठी शिक्षण विभागाला आदेश दिले जावेत, अशी मागणीही आमदार पाटील यांनी आपल्या पत्रात केली आहे.