मुंबई: शिक्षिकेला 5 महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर एक फ्रेंड रिक्वेस्ट आली. त्यांनी कोणतेही शहनिशा न करताच ती रिक्वेस्ट स्वीकारली. त्यानंतर त्यांच्यात संभाषण सुरु झाले. त्यानंतर ठगाने आपण इंग्लंडमध्ये डॉक्टर असल्याच्या भूलथापा मारल्या. एप्रिल महिन्यात आपल्या मुलीचा वाढदिवस असून तिच्यासाठी वस्तू खरेदी केल्या आहेत. तसेच तुमच्यासाठी एक गिफ्ट घेतल्याच्या सांगितले. विश्वास बसावा म्हणून त्याने मोबाईलवर एक फोटो पाठवला. ते गिफ्ट घरच्या पत्यावर पाठवत असल्याचे शिक्षिकेला सांगितले.
13 एप्रिलला महिलेला एक फोन आला. तिने आपण आंतरराष्ट्रीय विमानतळावरून बोलत असल्याचे भासवले. तुमच्या नावाचे एक गिफ्ट आले असून त्यासाठी 37 हजार रुपये शुल्क भरावे लागेल असे सांगितले. त्यावर विश्वास ठेवून महिलेने पैसे भरले. पैसे भरल्यावर काही दिवसांनी महिलेला फोन आला. त्या गिफ्टमध्ये 36 लाखांचे डॉलर असल्याच्या भूलथापा मारल्या. त्यासाठी पुन्हा आणखी पैसे भरावे लागतील असे सांगितले. गिफ्टच्या मोहात शिक्षिकेने विविध खात्यांत सात लाख रुपये भरले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पार्कसाइट पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली आहे.