मुंबई : लोकल ट्रेन ही मुंबईची लाईफलाईन आहे. रात्रीपासून पहाटेपर्यंत ही सेवा बंद असते. गणेशोत्सव, महापरिनिर्वाण दीन आदी विशेष दिवसात रात्रीही लोकल ट्रेन सुरु ठेवल्या जातात. येत्या रविवारी मुंबईत मॅरेथॉन आयोजित करण्यात आली आहे. त्यासाठी मध्य रेल्वेने २ तर पश्चिम रेल्वेने २ अशा एकूण ४ लोकल ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मॅरेथॉनमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना मोठा दिलासा मिळणार आहे. राज्यभरातून स्पर्धक उपस्थिती लावण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेच्या नियोजनाचे मोठे आव्हान समोर आहे.
मध्य रेल्वेवर २ ट्रेन : मध्य रेल्वेने रविवारी होणाऱ्या टाटा मुंबई मॅरेथॉनसाठी दोन स्पेशल लोकल चालविण्याचा निर्णय घेतला आहे. कल्याण - सीएसएमटी स्पेशल लोकल कल्याण येथून मध्य रात्री ३ वाजता सुटेल. पहाटे ४.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला पोहोचेल. तर हार्बर मार्गावर पनवेल - सीएसएमटी स्पेशल लोकल पनवेल येथून मध्य रात्री ०३.१० वाजता सुटेल. पहाटे ४.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला पोहोचेल. या दोन्ही स्पेशल लोकल सर्व स्थानकांवर थांबणार आहेत. अशी माहिती मध्ये रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
पश्चिम रेल्वेवर २ ट्रेन : पश्चिम रेल्वेने विरार ते चर्चगेट आणि चर्चगेट ते वांद्रे स्थानकांदरम्यान दोन अतिरिक्त लोकल चालविण्याचा निर्णय घेतला आहे. रविवारी मध्यरात्री २.४० आणि चर्चगेट ते वांद्रे लोकल पहाटे ३.३५ वाजता चालविण्यात येणार आहे. या दोन्ही लोकल धिम्या मार्गावर चालविण्यात येणार असल्याने सर्वच रेल्वे स्थानकात थांबणार आहेत. तसेच यामुळे पहाटे ३.५० वाजता सुटणारी ९०००४ बोरिवली-चर्चगेट लोकल रविवारी ३ वाजून ४५ मिनिटांनी सुटणार आहे.
या मार्गावर थांबणार : पश्चिम रेल्वे मार्गावर चालवण्यात येणाऱ्या ट्रेन मरीन लाइन्स, चर्नी रोड, ग्रांट रोड, मुंबई सेंट्रल,महालक्ष्मी, लोअर परळ, प्रभादेवी,दादर, माटुंगा रोड, माहिम, वांद्रे, खाररोड, सांताक्रुज, विलेपार्ले, अंधेरी, जोगेश्वरी, राम मंदिर, गोरेगांव, मालाड, कांदिवली, बोरीवली, दहीसर, मीरा रोड, भायंदर, नायगांव, वसई रोड, नालासोपारा आणि विरार या स्थानकांवर थांबणार आहे. स्पर्धकांच्या मोठ्या सहभागाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे सध्या आनंदाचे वातावरण पहायला मिळत आहे.
हेही वाचा : Spice Jet Flight : स्पाइसजेट फ्लाइटमध्ये बॉम्ब असल्याचा फोन; तपासात काहीही संशयास्पद आढळले नाही