मुंबई - महसूल विभागातील तलाठ्यांची भरतीसाठी होणाऱ्या परीक्षेत तांत्रिक कारणामुळे अडथळा आला. यावरून विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी शिंदे फडणवीस सरकारवर टीका केली. विजय वडेट्टीवार म्हणाले, राज्य सरकारचं असं बेजबाबदार वर्तन खपवून घेतलं जाणार नाही. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले, परीक्षेतील विद्यार्थ्यांनी निराश होऊन टोकाचं पाऊल उचलल्यास राज्य सरकार जबाबदार असणार आहे.
पुन्हा परीक्षा शुल्क आकारू नये - पुढे विरोधी पक्षनेते वडेट्टीवार म्हणाले, राज्य सरकारनं प्रत्येक जिल्ह्यात परीक्षा केंद्रे सुरू करण्याची आवश्यकता होती. त्याऐवजी, सरकारने फक्त चार केंद्रे सुरू केली आहेत. त्यामुळे परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना दूरवरच्या अंतरावर जाण्यास भाग पाडलं. परीक्षेला बसण्यासाठी लांबचा प्रवास करण्यास भाग पाडले. परीक्षेला बसलेल्या उमेदवारांनी खूप मेहनत घेतली. वडेट्टीवार पुढे म्हणाले की, राज्य सरकारनं परीक्षा शुल्क म्हणून प्रति उमेदवार एक हजार रुपये आकारले आहेत. आता, या उमेदवारांचे काय होणार? सरकारने तलाठी भरती परीक्षा दुसऱ्या दिवशी घेण्याचे ठरविले तर पुन्हा परीक्षा शुल्क आकारू नये, असे वडेट्टीवार यांनी राज्य सरकारला आवाहन केले.
टीसीएसकडून परीक्षेचे आयोजन : राज्यभरातून तलाठी पदाच्या 4 हजार 600 जागांसाठी 10 लाख 53 हजार उमेदवार बसले आहेत. गुणवत्ता यादीत समाविष्ट होण्यासाठी एकूण गुणांपैकी किमान 45 टक्के गुण मिळणं आवश्यक आहे. ही परीक्षा सकाळी 9 ते 11, दुपारी 12.30 ते 2.30 आणि दुपारी 4.30 ते 6.30 या वेळेत घेण्यात येणार आहे. परीक्षा केंद्रावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी दक्षता घेण्यात आली आहे. ही परीक्षा टीसीएस कंपनीकडून घेतली जाणार आहे. तलाठी पदासाठी एकूण 200 गुणांची संगणकावर आधारित परीक्षा घेतली जाणार आहे.
नागपुरात तलाठी भरती परीक्षा केंद्रांवर गोंधळ- परीक्षा आयोजित करण्यासाठी जबाबदारी असलेल्या टीसीएसनं तांत्रिक त्रुटीबाबत स्पष्टीकरण दिले. टीसीएसच्या दाव्यानुसार सेट्रल हार्डवेअरमध्ये समस्या होती. त्यामुळे तलाठी भरती परीक्षा 2023 च्या सर्व परीक्षा केंद्रांवर परीक्षा सुरू होण्यास उशीर झाला. नागपुरात तलाठी भरती परीक्षा केंद्रांवर गोंधळ दिसून आला. इंटरचे सर्व्हर डाऊन असल्यामुळं हा गोंधळ निर्माण झाला. सुरवातीला काही वेळ या तांत्रिक अडचणीत गेल्यानंतर सर्व्हरची स्पीड सुधारली. त्यानंतर परीक्षा व्यवस्थित सुरू झालेल्या आहेत.