मुंबई - बनावट लस आणि प्रमाणपत्र देऊन पैसे उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना कांदिवलीच्या एका हाय प्रोफाईल सोसायटीत घडली. याप्रकरणी दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
काय आहे प्रकार?
काही दिवसांपूर्वी कांदिवली पश्चिम परिसरातील हिरानंदानी सोसायटीतील कोरोना लसीकरणाच्या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कोविशिल्डची लस टोचल्यानंतर या सोसायटीतील बऱ्याच जणांना कुठल्याही प्रकारचे लक्षणे दिसून आली नसल्यामुळे त्यांना देण्यात आलेली लस ही खरी होती का? असा सवाल केला जात आहे. यावेळी नागरिकांना बनावट लस आणि प्रमाणपत्र देऊन पैसे उकळण्यात आले, असा आरोप कांदिवलीच्या हिरानंदानी सोसायटीतील नागरिकांनी केला आहे. याबाबत त्यांनी कांदिवली पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
हेही वाचा - 'नुसत्या टोप्या घालून राजकारण करू नका; मुस्लिम आरक्षण द्या'
मुंबई पोलिसांच्या कांदिवली ठाण्याचे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी अजून कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. तसेच ही हे शिबिर बनावट होते, हेदेखील अजून सिद्ध झालेले नाही. चौकशी केल्यानंतरच सत्य बाहेर येईल, अशी माहिती नाव न सांगण्याच्या अटीवर पोलिसांनी दिली.
पोलिसांकडून तपास सुरू -
या सोसायटीत राहणाऱ्या 390 सदस्यांपैकी कोणालाही कोरोना लस घेतल्यानंतर कुठल्याही प्रकारचा त्रास झालेला नाही. मात्र, त्यांना लस घेतल्याचे प्रमाणपत्रसुद्धा देण्यात आलेला नाही. यासंदर्भात मुंबई पोलिसांकडून तपास केला जात आहे. काही जणांना जी लस देण्यात आलेली आहे, त्याचे प्रमाणपत्र व लस देण्यात आलेल्या जागेचा पत्ता वेगवेगळ्या ठिकाणचा असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. सोसायटीतील सदस्यांना त्यांच्या सोसायटीच्या आवारातच लसीकरण करण्यात आले होती.
लसीकरणानंतर फोटो घेण्यास मनाई -
या सोसायटीत राहणाऱ्या नागरिकांनी सांगितले, त्यांनी एका लसीसाठी 1460 रुपये मोजलेले आहेत. 1360 ही लसीची किंमत असून त्यावर 60 रुपये जीएसटी घेण्यात आलेला आहे. लस घेतल्यानंतर त्यांना कुठलाही प्रकारचा मेसेज आलेला नाही. ही लस घेतल्यानंतर या सोसायटीतील नागरिकांना लसीकरणाचा फोटो किंवा सेल्फी घेण्यास मनाई करण्यात आलेली होती.