मुंबई - अनलॉक जाहीर झाल्यानंतर राज्यात 0 ते 10 वयोगटातील मुलांमध्ये, कोरोनाचे प्रमाण वाढत असून गेल्या महिन्याभरात राज्यातील लहान मुलांचे बाधित होण्याचे प्रमाण तिपटीने वाढले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आता अशात पावसाळ्याला सुरूवात झाली असून या काळात डेंग्यू आणि मलेरियाचाही धोका वाढला आहे. त्यामुळे 10 वर्षाखालील मुलांना पुढील काही महिने घराबाहेर घेऊन पडू नका किंवा मुलांना विनाकारण घराबाहेर सोडू नका, असे आवाहन बालरोग तज्ज्ञ करत आहेत. दरम्यान, यूनिसेफच्या आरोग्य तज्ञांनी लहान मुलांना कोरोनाची लागण लगेच होते असे सांगितले आहे. पण, सुदैवाने लहान मुलांचा मृत्यूदर मात्र कमी आहे. मागील तीन महिन्यात मुंबईत 10 वर्षाखालील 7 बालकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
शासनाने ज्येष्ठ नागरिक आणि 10 वर्षाखालील मुलांना घराबाहेर निघण्यास मज्जाव केला आहे. पण तरीही काही पालक मुलांना घेऊन बाहेर फिरत आहेत. यावर डॉक्टरांनी नाराजी व्यक्त केली. काही दिवसांपासून लहान मुलांमध्ये कावासाकी आजारासारखी लक्षणे दिसून येत आहेत. यात जीभ लाल होणे, अंगावर लाल चट्टे आणि अत्यंत घातक म्हणजे छातीत दुखणे असे लक्षणे समोर येत आहेत. मुलांमध्ये अशी लक्षणे असल्यास आणि त्याकडे दुर्लक्ष केल्यास मुलांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे मुलांना घराबाहेर पडून देऊ नये, त्यांना योग्य आहार देणे गरजेचे आहे, असे नानावटी रुग्णालयातील बालरोग तज्ज्ञ डॉ. जागृती संघवी यांनी सांगितलं.
याशिवाय कोरोनाचा विचार केल्यास, राज्यात 0 ते 10 वयोगटातील कोरोना रुग्णांचा आकडा 6000 च्या घरात गेला आहे. तर मुंबईत हा आकडा 1311 (30 जून) इतका आहे. त्यातील 7 रुग्णांचा तीन महिन्यात मृत्यू झाला असून यासंबंधीचे वृत्त सर्वात प्रथम 'ईटीव्ही भारत'ने गुरुवारी प्रसिद्ध केले होते. 10 ते 20 वयोगटातील मुंबईतील आकडा 2428 असा असून यात 17 मुलांचा मृत्यू झाला आहे. अनलॉकमध्ये लहान मुलं घराबाहेर बाहेर पडत आहेत. त्यामुळे कोरोनाची लागण होण्याची शक्यता वाढली आहे. याशिवात डेंग्यू-मलेरियाचा ही धोकाही वाढला आहे. वाढत्या धोक्यामुळे बालरोग तज्ज्ञ मुलांना बाहेर घेऊन जाऊ नका तसेच त्यांना बाहेर सोडू नका, असे आवाहन पालकांना करत आहेत.
दरम्यान, लहान मुलाना ताप येणे नेहमीचे आहे असे म्हणत आपण ताप उतरला की दुर्लक्ष करतो. पण कोरोना वा कावासाकीमध्ये ताप आल्यानंतर 4 ते 7 दिवसात इतर लक्षणे दिसतात. तेव्हा या दिवसात विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. तसेच येत्या काळात कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पालकाची जबाबदारी आता वाढली आहे.
हेही वाचा - पंकजा मुंडे केंद्रात जाण्यास उत्सुक नसल्याचे चित्र, समर्थक ही नाराज
हेही वाचा - कोरोनावर भारतीय लस : आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली 'ही' महत्त्वाची माहिती