मुंबई : दादर परिसरात नेहमी वर्दळ असलेल्या फुल मार्केटमध्ये दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास एक संशयास्पद बॅग आढळून आली. त्यानंतर BDDS (बॉम्ब शोधक आणि नाशक पथक) च्या टीमला पाचारण करण्यात आले. बीडीडीएसच्या पथकाने बॅगची कसून तपासणी केली. तेव्हा ती बॅग संशयास्पद बॉम्ब सारखी वाटत होती. मात्र बागेची तपासणी केल्यानंतर त्यात बॉम्ब सदृश्य काहीही नसल्याचे आढळून आले. या बॅगेत 9 ते 10 किलो गांजा आढळून आला आहे.
बॅगेत 9-10 किलो गांजा : सुमारे तासाभराच्या या तपासणीत संपूर्ण परिसर बंद करण्यात आला होता. नागरिकांना या परिसरातून ये जा करण्यासाठी पोलिसांनी बंदी आणली होती. त्यानंतर बॅग उघडून तपासणी केली असता बॅगेत 9-10 किलो गांजा आढळून आला. आता पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करून पिशवी तेथेच सोडून गेलेल्या ड्रग्ज तस्कराचा शोध घेत आहेत.
पोलिसांची तारांबळ : दादर परिसर नेहमीच गजबजलेला असतो. त्यामुळे, अति संवेदनशील असलेल्या दादर परिसरात पोलिसांचे पेट्रोलिंग आणि बंदोबस्त बऱ्यापैकी असतो. अलीकडे काही दिवसांपासून पोलीस रस्त्यावर बसणाऱ्या बेकायदेशीर फेरीवाल्यांना हटकत असल्याचे वारंवार दिसून येत आहे. या फेरीवाल्यांमुळे होणाऱ्या गर्दीचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतो.
दादर परिसरात नेहमी वर्दळ : मुंबईतील संवेदनशील आणि दाट गर्दी असलेले ठिकाण म्हणजे दादर. या दादर परिसरात नेहमी वर्दळ असलेल्या फुल मार्केटमध्ये संशयास्पद बॅग आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.गर्दीवर नियंत्रण ठेवणे हे दादर आणि शिवाजी पार्क पोलिसांपुढे यक्ष प्रश्न उभा असतानाच आज संशयास्पद बॅग आढळल्याने पोलिसांची तारांबळ उडाली होती.