मुंबई Suspension : पोलीस ठाण्यात पोलीस अधिकाऱ्याच्या गैरहजेरीत त्याच्या केबिनमध्ये पार्टी करणं पोलीस कर्मचाऱ्यांना भोवलं आहे. भांडुप पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 25 ऑक्टोबरला दुपारी 2 च्या सुमारास एएसआय (सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक) सुनील कंक, पोलीस कॉन्स्टेबल शैलेश पाटोळे, प्रेमचंद सावंत आणि मनोहर शिंदे हे भांडुप पोलीस निरीक्षकांच्या कॅबिनमध्ये पार्टी करत होते. या पार्टीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भांडुप विभागाचे एसीपी (सहाय्यक पोलिस आयुक्त) यांनी तपास करून अहवाल सादर केला.
चौघे दोषी - एसीपींनी सादर केलेल्या अहवालात हे चौघे दोषी आढळले. त्याआधारे पोलीस उपायुक्त स्तरावरील अधिकाऱ्याने या चौघांना निलंबित करण्याचे आदेश जारी केले. भांडुप पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (कायदा व सुव्यवस्था) हे त्यांच्या कार्यालयात नसताना त्यांचे ऑर्डरली प्रेमचंद सावंत तिथे उपस्थित होते आणि सावंत यांनी या तिघांना पार्टी करण्यापासून रोखले नाही, त्यामुळे प्रेमचंद सावंत यांनाही निलंबित करण्यात आल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं.
निलंबनाची कारवाई - 25 ऑक्टोबरला साधारण दुपारी २ वाजताच्या सुमारास सहायक फौजदार सुनील कंक, पोलीस हवालदार, शैलेश पाटोळे आणि पोलीस हवालदार मनोहर शिंदे हे पोलीस निरीक्षक (कायदा व सुव्यवस्था ) यांच्या भांडुप पोलीस ठाण्यात असलेल्या कक्षात हजर नसताना त्या ठिकाणी पार्टी करत असल्याबाबत कसुरी अहवाल सहाय्यक पोलीस आयुक्त भांडुप विभाग मुंबई या कार्यालयात सादर केला आहे. हे तीन पोलिस अंमलदार गैरवर्तन करत असताना त्या ठिकाणी पोलीस निरीक्षक कायदा व सुव्यवस्था यांचे कार्यालयीन मदतनीस पोलीस हवालदार प्रेमचंद सावंत तिथे त्यांचे दैनंदिन कामकाज करत होते. पार्टी करण्यास सावंत यांनी मज्जाव केला नाही अथवा या प्रकरणाची माहिती वरिष्ठांना देणे आवश्यक असतानाही त्यांनी दिली नाही. म्हणून प्रेमचंद सावंत यांच्यावर देखील निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
पोलीस अंमलदार यांनी महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1979 वर्तणूक मधील नियम क्रमांक 3 चे उल्लंघन केले आहे. याकरता मुंबई पोलीस शिक्षा व अपील नियम 1956 च्या नियम तीन मध्ये तरतुदीस अनुसरून त्यांच्याविरुद्ध घेण्यात येणाऱ्या प्राथमिक विभागीय चौकशीच्या अधीन राहून आदेश स्वीकारल्याच्या तारखेपासून त्यांना त्वरित प्रभावाने सेवेतून निलंबन करण्यात आले आहे. सहायक फौजदार कंक, पोलिस हवालदार शिंदे, पोलिस हवालदार सावंत यांनी 23 नोव्हेंबरला आणि पोलीस हवालदार पाटोळे यांनी 27 नोव्हेंबर निलंबन केल्याचे आदेश स्वीकारले आहेत.